कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर विधीमंडळामध्ये हक्कभंग दाखल (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या राजकारणावर ती कविता होती. मात्र यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली. तसेच कुणाल कामरा विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाने कुणाल कामराची पाठराखण केली. आता विधीमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कामरा विरोधात शिंदे गटासह महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला. तर ठाकरे गटाने कुणाल कामरा याची बाजू उचलून धरली होती. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता पुन्हा एकदा त्याच चालीमध्ये बोलून दाखवली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हेच सत्य असून ते बोलले तर का मिरच्या झोंबल्या असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला होता. यानंतर आता विधीमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करुन निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “विधीमंडळाच्या विरिष्ठ सभागृहामध्ये प्रवीण दरेकर यांनी माझ्याविरोधात हक्कभंग दाखल केला असल्याची माहिती मला मिळाली. माझ्यावर हक्कभंग आणण्यासारखं कोणतं विभित्स्क कृत्य केलं आहे? मी सभागृहात कोणाला 56 जण पायाला बांधून ठेवते अशी भाषा केली आहे का? सभागृहातील कोणत्याही सदस्याचा मी एकेरी उल्लेख केला आहे का? सभागृहातील कोणत्याही सदस्याचा अपमान होईल अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे का?” असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “सभागृहाबद्दल मी खोटी माहिती मी पुरवली आहे का याबद्दल मला कळायला हवे. आणि जर माझ्यावर हक्कभंग येत असेल तर सभागृहामध्ये वेडे वाकडे हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही कधी हक्कभंग आणणार आहात? किंवा सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीने झाला हे स्पष्ट असताना सुद्धा तरी सभागृहाला खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अंतरवलीमध्ये लाठीहल्ला केल्याबद्दल खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस किंवा कोकाणातील रिफायनरी प्रोजेक्ट होणाऱ्या जागेवर राहणाऱ्या लोकांची पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराची खोटी माहिती देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणे शक्य आहे का? कृपया याची सुद्धा माहिती सभागृहाने द्यावी. बाकी माझ्यावर जे काही आरोप कराल त्या आरोपांचं उत्तर मी यथावकाश देईल,” असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.