
सुजय विखेंना उच्च न्यायालयाचा धक्का; निलेश लंकेंची खासदारकी कायम, निवडणूक याचिका फेटाळली
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीनंतर आता न्यायालयीन लढाईचाही निकाल लागला आहे. भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आज (8 एप्रिल 2026) फेटाळून लावली. या निकालामुळे निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची खासदारकी आता निर्धोक झाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, लंके यांनी निवडणुकीत गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप करत विखे यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लंके यांची निवड रद्द करावी, अशी मागणी विखे यांनी कोर्टाकडे केली होती.
न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विखे यांची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत विखे यांनी केवळ निलेश लंके यांनाच प्रतिवादी केले होते, तर निवडणूक अधिकारी किंवा इतर उमेदवारांना यात प्रतिवादी करण्यात आले नव्हते, हे या याचिकेचे वैशिष्ट्य ठरले.
दीर्घकाळ प्रलंबित: २०२४ मध्ये दाखल झालेली ही याचिका प्रदीर्घ काळ प्रलंबित होती. इतर मतदारसंघांतील अशाच स्वरूपाच्या याचिका यापूर्वीच निकाली निघाल्या असताना, नगरच्या या याचिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
लंकेंचा विजय कायम: न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे लंके यांच्या निवडीवर आता शिक्कामोर्तब झाले असून, न्यायालयीन लढाईतही त्यांनी विखेंवर बाजी मारली आहे.
राजकीय परिणाम: या निकालामुळे नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा लंके गटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून, विखे गटासाठी हा कायदेशीर मोठा धक्का मानला जात आहे. या निकालामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. बाळकृष्ण येथून सात वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील, विठ्ठलराव विखे पाटील, हे देखील काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी राज्याच्या सहकारी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. काँग्रेसचे तिकीट नाकारल्यामुळे, बाळकृष्ण यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे उमेदवार यशवंत गडाख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. तथापि, त्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या वक्तव्यांमुळे एक न्यायालयीन खटला दाखल झाला, ज्याचा निकाल विखे पाटील यांच्या बाजूने लागला. राजकारणात सक्रिय असलेली ही विखे पाटील कुटुंबाची तिसरी पिढी आहे.