
सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
Sunetra Pawar on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण कोणीही करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच दादांच्या आई, मुलं आणि स्वतःपेक्षा मोठं दुःख दुसऱ्या कोणाला असू शकतं, असा सवालही त्यांनी केला.
अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, प्रत्येक गोष्ट मीडियासमोरच मांडली पाहिजे असं नाही, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाच्या तपासावर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि दुःख आपल्यापेक्षा अधिक कोणाला माहिती असणार, असा सवाल सुनेत्रा पवार यांनी केला. दादांच्या घटनेबाबत सर्वांना सत्य आणि निर्णय कळायला हवा, यासाठी आम्हीही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शब्द दिला आहे आणि तो पाळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणाही आपलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक वेळ दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रत्येक तपासाची माहिती सातत्याने माध्यमांमधून समोर येणं आवश्यक नसतं. वारंवार अशा प्रकारच्या चर्चा झाल्यामुळे मीडिया ट्रायल होण्याची शक्यता आहे, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.
“माझा तपास यंत्रणांवर, कायदा आणि संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे आपण त्यांना वेळ दिला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
दादांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आम्हालाही लवकरात लवकर सत्य समोर यावं असंच वाटतं. त्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कुटुंबीयांना या प्रकरणाची चिंता नाही किंवा त्यांना काही फरक पडत नाही, असा अर्थ काढण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून सरकारला सवाल केला होता. अजित पवार हे सरकारमधील उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या अपघातानंतर आजपर्यंत एफआयआर झाला आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता.
अमित ठाकरे यांच्याविरोधात फोटो हटवल्याप्रकरणी एफआयआर होतो, मग आपल्या भावाच्या मृत्यूला न्याय कधी मिळणार, असा सवालही त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी थेट नाव न घेता भूमिका मांडली. दादांच्या जाण्याचं राजकारण कोणीही करू नये, असं त्या म्हणाल्या. तसेच दादांची आई, त्यांची मुलं आणि आपण स्वतः दुःखातून जात असताना या घटनेबाबत कुटुंबीयांना सर्वाधिक चिंता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तपास यंत्रणांवर विश्वास ठेवून त्यांना वेळ दिला पाहिजे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येईल, अशी अपेक्षाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.