
सुनेत्राताई उपमुख्यमंत्री; पवारांचा शब्द अंतिम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यात शोक व्यक्त केला जात आहे. असे असताना आता अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात शुक्रवारी संध्याकाळी वेगाने चक्रे फिरली असून, आज दुपारी दोन वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.
याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, बैठकीत नवीन नेत्याची निवड झाल्यानंतर त्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल. सूत्रांनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. पक्षातील हालचाली पाहता, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा मंत्री म्हणून शपथविधी होऊ शकतो आणि त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून पतीचा वारसा सांभाळतील.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: मोठी बातमी! Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर ‘या’ मंत्रालयांची मिळणार जबाबदारी
दरम्यान, कुटुंबाचे प्रमुख शरद पवार यांच्या संमतीनंतरच या संपूर्ण प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असा दावा कौटुंबिक सूत्रांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंची चर्चा
शुक्रवारी संध्याकाळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. तटकरे यांनी माहिती दिली की, शनिवारी होणाऱ्या बैठकीला आमदारांसह खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत पटेल किंवा तटकरे यांची पवार कुटुंबाशी चर्चा झाली नव्हती. मात्र, छगन भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केले की, पूर्ण महाराष्ट्राला सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटले प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या निवडीला कोणाचाही विरोध नाही. मात्र, या पदासाठी कुटुंबाची संमती घेतली जाईल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, राष्ट्रवादी हा ‘महायुती’चा महत्त्वाचा घटक आहे आणि पक्ष नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण करत आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत.
नरेश अरोरा यांची भूमिका
या संपूर्ण राजकीय घडामोडींत राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाशी या विषयावर चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी या प्रस्तावाला संमती दिली असल्याचा दावा केला जात आहे.