State President Sunil Tatkare made a statement regarding Ajit Pawar and Sharad Pawar coming together.
पंढरपूर : मागील तीन वर्षांपासून राज्यामध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षाहून वेगळी भूमिका घेत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये चुरशीची लढत दिसून आली. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवार गटाचे नेते व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या एकीकरणा संदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार व शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी यासाठी मी विठुरायाला कोणतेही मागणं घातलेलं नाही, आणि ते घालण्याचं कोणतं कारण ही नाही. असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. सुनील तटकरे हे पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एन.डी.ए. सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यात आम्हाला यश मिळत राहो. या विचारांशी जे असतील त्यांच्या सोबत आहोत,” असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. सुनिल तटकरे आज सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शना नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुनिल तटकरे यांच्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यावरुन मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ?
तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.