
Sushma Andhare
Sushma Andhare : महाराष्ट्रात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांवर परिणाम झाला आहे. काही भागांत सोयाबीनची उभी पिकं वाळत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात असताना विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपल्या शेतातील सोयाबीनची शेंग दाखवत त्यांनी सध्याच्या परिस्थितीची तीव्रता मांडली. एका सोयाबीनच्या शेंगेत दोन दाणेसुद्धा भरले नसल्याचं सांगत अंधारेंनी सरकारने औपचारिकता न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.
त्या म्हणाल्या, “ही माझ्या शेतातील सोयाबीनची शेंग आहे. यामध्ये दोन दाणेसुद्धा भरलेले नाहीत. ही परिस्थिती पाहता दुष्काळ फक्त औपचारिकता म्हणून जाहीर करण्याची गरज नाही, तर प्रत्यक्षात दुष्काळी परिस्थिती आहे,” असं अंधारे म्हणाल्या.
सरकारकडून पाहणी दौरे आणि आढावा बैठका सुरू असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीतील काजू-बदामाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांकडून सरकारवर टीका झाली आहे.
अधिकारी आढावा बैठकीदरम्यान सोशल मीडियावर व्यस्त असल्याचा आरोपही अंधारेंनी केला. “अधिकाऱ्यांची चूक नाही, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा धाक असतो,” असा दावा करत त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. काही भागांत ४० ते ४५ दिवसांपर्यंत पाऊस न झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत सरकार दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे.