‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
Rohit Pawar : राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात तर परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत.
धाराशिव आणि बीड जिल्ह्यांनंतर रोहित पवार लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पंचनामे आणि मदत मिळत नसल्याबद्दल आपली नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली. पिकांची परिस्थिती पाहिल्यानंतर रोहित पवारांनी सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.
खरीप हंगामात 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं असून रब्बीचीही आशा मावळली आहे, असा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पुढील दहा महिने शेतकरी आणि सर्वसामान्यांना कसं जगवायचं, हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांसाठी राखून ठेवलेला निधी सध्याच्या संकटात शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. सरकारला पत्राद्वारे काही दिवसांची मुदत दिल्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाची भूमिका घेण्याचा शरद पवारांचा इतिहास असल्याचं त्यांनी म्हटलं.
“आज अजित पवार असते तर नियम आणि अटींमध्ये अडकले नसते,” असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेलं नेतृत्व म्हणून त्यांनी अजित पवारांचा संदर्भ दिला आणि महायुतीतील सध्याच्या नेत्यांवरही टीका केली.
मराठवाड्यातील पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि परिस्थितीचा अहवाल शरद पवार यांना देणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. आता सरकार दुष्काळाबाबत काय निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या मदतीची घोषणा होते, याकडे लक्ष लागलं आहे.






