
बुलढाण्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हर्षवर्धन सपकाळांनी पीक परिस्थितीची पाहणी केली.
बुलढाणा : पावसाने मोठा खंड दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पिकांची अवस्था बिकट झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला.
गेल्या 40 ते 45 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकं करपून गेली आहेत, असं सपकाळ यांनी म्हटलं. शेतकरी संकटात असताना सरकार मात्र बैठका आणि चर्चांमध्ये वेळ घालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. “शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे?” असा सवाल त्यांनी केला.
बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने तब्बल 20 एकर सोयाबीन पीक मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेताची अवस्था पाहण्यासाठी यावं, अशी आर्त विनंती केली होती. मात्र, कोणीही त्याच्याकडे फिरकलं नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.
शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
कृषिमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही संबंधित शेतकऱ्याची भेट घेतली नसल्याचं सांगत सपकाळांनी सरकारला धारेवर धरलं. “शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने पाहतो, पण सरकारला त्यांचं काहीही पडलेलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सपकाळांनी काही ठोस मागण्या मांडल्या. हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत, शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक शुल्क माफ करणं आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्याग्रह आणि गावोगावी आंदोलन सुरू असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शेतकऱ्यांना हवालदिल न होण्याचं आवाहनही सपकाळ यांनी केलं. “आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका,” असं सांगत संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा, असं त्यांनी म्हटलं. आता सपकाळांच्या या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.