सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे आडनावावरून केलेल्या टिप्पणीला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नीलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य करताना न्यायालयावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा, असे म्हटले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना निकालाबाबत वेगवेगळे दावे करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यायालयात दोन्ही बाजूंचे मुद्दे आणि पुरावे मांडले जात आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत गैरसमज निर्माण करणारे दावे करू नयेत, अशी भूमिका गोऱ्हे यांनी मांडली. न्यायाधीशांवर आपला विश्वास असल्याचे सांगत त्यांनी वकिलांची नावे किंवा त्यांची प्रसिद्धी यापेक्षा अंतिम निर्णय महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले.
‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाल्याचा उल्लेख करत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. महाविकास आघाडी एकत्र असूनही विरोधी पक्षनेतेपद मिळवता आले नाही, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गटाबाबत बोलताना त्यांनी ‘उबाठा’मधील ‘ठ’ ऐवजी ‘ढ’ असायला हवे, अशी खोचक टिप्पणी केली.
नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आडनावावर अनावश्यक टिप्पणी करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली. अंधारे यांनी पुढे गोऱ्हे यांच्या नावावरूनच टिपणी करत, त्यांच्या नावातील “नि” ऐवजी “ची” असायला हवे होते, असा खोचक टोला लगावला.
‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह यासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दोन्ही गटांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे दोन्ही गटांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

