Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच (फोटो ISTOCK)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. नोव्हेंबर महिना सध्या सुरु असून, थंडीचा अनुभव मिळत आहे. मात्र, नागरिकांना अद्याप गुलाबी थंडीची प्रतीक्षा असून, कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. नोव्हेंबर महिना सुरू असतानाही राज्यात अपेक्षित थंडीचा जोर जाणवत नसल्याचे चित्र आहे. राज्यात आज अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, तापमानातील चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ घोंघावत आहे. त्याचबरोबर आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने तापमानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गुरुवारी (दि.20) राज्यातील किमान तापमानाची नोंद पाहता धुळे येथे सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. यवतमाळमध्ये ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गोंदिया, जेऊर, जळगाव आणि वर्धा येथे पारा १३ अंशांच्या खाली राहिला. पुणे, महाबळेश्वर, निफाड आणि नागपूर येथेही किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविण्यात आले.
दरम्यान, राज्यातील कमाल तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ येथे ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. तसेच डहाणू, जळगाव आणि सोलापूर येथेही कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे राहिला.
FAQ
1. राज्यात अद्याप गुलाबी थंडीचा जोर का जाणवत नाही?
राज्यातील हवामान प्रणालींमुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने थंडीचा अपेक्षित जोर जाणवत नाही.
2. राज्यात आज हवामान कसे राहण्याची शक्यता आहे?
राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तापमानातील चढ-उतार कायम राहतील.
3. बंगालच्या उपसागरात कोणती हवामान प्रणाली सक्रिय आहे?
बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ घोंघावत असल्याचे वृत्त आहे.






