Tejashwi Ghosalkar visited Matoshree and met Uddhav Thackeray political news
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. नेत्यांमध्ये आणि पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत चार महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई महापालिकेसाठी सर्वांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना कौटुंबिक संबंध असलेल्या महिला नेत्याने साथ सोडल्यामुळे मोठा धक्का बसला.
आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कौटुंबिक नाते असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला. स्थानिक नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजी होती. यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात होता. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी आज (दि.14) मातोश्रीवर भेट दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद झाला आहे. ठाकरे गटाकडून घोसाळकर यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवरील भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंची मी भेट घेतली. आज त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. या समस्यांवर उत्तर मिळालं की मी पुढचा निर्णय लवकरात लवकर घेईन. विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना मी समस्यांबाबत पत्र दिलं होतं. स्थानिक पातळीवर या समस्या सोडवल्या जातात. पण तसं झालं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे यावं लागलं.” अशा भावना तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर त्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शिंदे गटासोबत देखील जातील अशी चर्चा होती. तसेच त्यांना भाजपाकडून ऑफर आल्याचंही म्हटले जातंय. त्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजूनही मी ठाकरेंबरोबरच आहे. अजूनही मी गद्दारी केलेली नाही, असा टोला तेजस्वी घोसाळकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरु असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना उबाठामधील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये त्यांना व्हॉट्सअपद्वारे धमकी देण्यात आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता.