thackeray group vasant more target bjp mp medha kulkarni on Pune railway station renamed as bajirao peshwa
पुणे : शहरामधील रेल्वे स्थानकाच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी भाजपच्या नेत्या व खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती. यानंतर शहरामध्ये नवीन वाद सुरु झाला आहे. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलण्याची मागणी केली होती. यानंतर आता राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
पुणे शहरामध्ये जोरदार पोस्टरवॉर सुरु झाले आहे. पुणे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पोस्टर लावून शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील रेल्वे स्थानकाचे नाव बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाने खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात शहरातील विविध भागात पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये एका पोस्टरवर लिहिण्यात आले आहे की, “कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. महत्त्वाच म्हणजे बाजीराव पेशवे यांचं शनिवारवाड्यात वास्तव्य होतं. त्याच शनिवारवाड्याजवळ बॅनर लागले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या मागणीबाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी त्या म्हणाल्या की, सोमवारी 23 जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिवीजनची बैठक बोलवण्यात आली होती. अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनच नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे. ‘मी फक्त त्या मागणीची पुनरुच्चार केला आहे. लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहित व्हावा, हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे. पुणे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. पुणे आयटी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं. पण पुण्याबरोबरच अन्य राज्यातील, शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा, अशा शब्दांत खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांची मागणीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वसंत मोरे म्हणाले की,” एखाद्या महापुरुषाचे नाव कोणत्याही प्रकल्पाला द्यायचं असेल तर प्रथम ती वास्तू सुसज्ज सुंदर केली पाहिजे…त्याचं उदाहरण कात्रज तलाव…काहीच वर्षांपूर्वी हागणदारी युक्त असणारा भाग म्हणून कात्रज परिसरात प्रसिद्ध होता 2007 ला मी नगरसेवक झालो आणि खऱ्या अर्थाने पेशवाईच्या काळात तयार झालेल्या या तलावांचा मी विकास चालू केला आणि अवघ्या काही वर्षात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे तलाव प्रसिद्ध झाले… त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा , पाटील वाडा ,जॉगिंग ट्रॅक, फाउंटन ,भला मोठा राष्ट्रध्वज, फुलराणी, आजी आजोबा उद्यान, भली मोठी पांडुरंगाची मूर्ती, साईबाबा मंदिर, असे अनेक प्रकल्प उभे केले आणि त्यानंतर या तलावाचे नामकरण श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशय असे केले याचा मला सार्थ अभिमान आहे… नुसती नामकरण करून जबाबदारी संपत नाही तर त्या परिसराचा विकास करणे क्रमप्राप्त असतो,” अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे.