ठाकरे गटाचे बाबर राष्ट्रवादीत(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना असे दोन गट पडले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोडून अनेक नेतेमंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. त्यातच हडपसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाबर यांच्या प्रवेशाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळाले आहे.
पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड येथील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महादेव बाबर यांचे स्वागत करताना पक्षाची ताकद वाढल्याचे सांगितले. त्यांनी बाबर यांच्यासोबतच्या पूर्वीच्या सहकार्याचा उल्लेख करत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
अजित पवार म्हणाले, ‘सर्वांना मोठी पदे मिळत नाहीत, छोटी पदे स्वीकारून कामाचा आवाका दाखवा. संघटना बळकट करण्यासाठी मिळून-मिसळून काम करुया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू असून, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा दौरा आणि त्यानंतर स्वतःचा महाराष्ट्र दौरा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षात येणाऱ्यांनी प्रतिष्ठा जपावी, उर्मटपणा टाळावा आणि महिला सन्मानाची काळजी घ्यावी’, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुढील टप्प्यात अधिक प्रवेश
येत्या काळात काही माजी नगरसेवक आणि अधिकारी महाविकास आघाडीत प्रवेश करतील असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. त्यात शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.