भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेंवर महिला पोलीस निरीक्षकाकडून विनयभंगाचा आरोप; एफआयआर दाखल
Pune Crime : पुण्यातील राजकीय वर्तुळात संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपचे पुणे शहर पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल (FIR) केला आहे. सोमवारी (23 जून) हा सर्व प्रकार घडला. भाजपच्या कार्यक्रमानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना जवळच्याच दुकानात चहा पिण्यासाठी नेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे यांनी दोनवेळा अशोभनीय व लज्जास्पद स्पर्श केला, असा आरोप संबंधित महिला पोलीस निरीक्षकाने केला आहे.
संबंधित महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार पोहोचवण्यात आली. त्यानुसार, प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘या’ माजी आमदाराने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, प्रमोद कोंढरे यांनी पत्रक काढून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांनी हे सर्व गैरसमजुतीमुळे घडल्याचे स्पष्ट करत, आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, कोंढरे यांच्यावर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस विभाग करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दुसरीकडे, प्रमोद कोंढरे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित घटनेबाबत पोलिसांकडे दिलेल्या जबाबात कोंढरे यांनी संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करत “माझा संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही”, असा दावा केला आहे.
कोंढरे सध्या भाजपच्या पुणे शहराच्या महामंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी “सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं” अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75(1) अन्वये प्रमोद कोंढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबांच्या आधारे अधिक माहिती संकलित केली जात आहे.