
'महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका...'; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या जरी असल्या तरी याचे निकाल येणे अद्याप बाकी आहे. असे असताना आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. महानगरपालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तर जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
मुंबईसह प्रमुख महानगरपालिका आता महायुती म्हणूनच लढण्यात येणार आहे. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीच हे जाहीर केले आहे. आता सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणूकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करुन युतीचा फॉर्म्युला ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
तसेच आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकासंदर्भात कशा प्रकारे पुढे जायचे याबाबत माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपाच्या कोअर कमिटीचीही बैठक झाली. महानगरपालिका निवडणूका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका कदाचित लाबंणीवर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये लढताना आगामी रणनिती आखण्याच्या दृष्टीने काही पध्द्ती विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये महायुती व्हायला हवी, अशी अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली.
वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय
प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले, सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करुन युतीचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिका निवडणूकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करुन पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल. तसेच आगामी निवडणूका या महायुती म्हणून सकारात्मकरित्या लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Anjali Damania : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार