
अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव!
महापालिका निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाले होते. त्यानंतर आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर महापौरपद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाले.
या आरक्षणानंतर भाजपा–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीकडून सात महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.
शारदा ढवण पूर्वी शिवसेनेत होत्या. त्यांनी २०१८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत युती असतानाही त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव केला. प्रभाग क्रमांक एकमध्ये चार सदस्यांच्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असताना, ढवण या एकमेव भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी ठरल्या. भाजपाने नुकतेच त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत
पुष्पा बोरुडे या मागील महापालिकेत शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या आणि पदाधिकारीही होत्या. मात्र यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला असून, त्या पक्षासाठी तुलनेने नवीन चेहरा आहेत. आशाबाई कातोरे यांच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे.
राष्ट्रवादीकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे आणि अश्विनी लोंढे या तिघी प्रथमच निवडून आल्या आहेत. सुनीता फुलसौंदर या यापूर्वी शिवसेनेकडून नगरसेविका होत्या. त्यांचे पती भगवान फुलसौंदर हे अहिल्यानगरचे पहिले महापौर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पत्नीला उमेदवारी मिळवून दिली.
अहिल्यानगर महापालिकेत सध्या भाजपा–राष्ट्रवादी युतीची सत्ता आहे. ६८ पैकी ५२ जागा युतीकडे असल्याने विरोधकांकडे फारशी संधी नाही. मात्र, युतीमध्ये सुरुवातीची अडीच वर्षे महापौरपद भाजपाकडे की राष्ट्रवादीकडे राहणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. हा निर्णय माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप घेणार असल्याची चर्चा आहे.
पूर्वी अहिल्यानगर महापालिकेत महापौर निवडीत घोडेबाजार होणे हे नेहमीचेच होते. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे बोलले जात असे. मात्र सध्याची राजकीय गणिते पाहता, यावेळी घोडेबाजाराची शक्यता नसल्याने जो कोणी महापौर बनेल, तो अत्यंत स्वस्तात महापौरपदावर विराजमान होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.