
Rajendra Pawar, Rohit Pawar, MPSC Student Protest, Maharashtra Politics
एमपीएससीच्या आंदोलनात रोहित पवार यांच्यासोबत आपण रस्त्यावर झोपल्याचा उल्लेख राजेंद्र पवार यांनी पोस्टमध्ये केला आहे. विरोधकांकडून सातत्याने केला जाणारा ‘तोंडात सोन्याचा चमचा’ हा आरोपही त्यांनी यावेळी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाच्या संघर्षाची आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी त्यांनी या पोस्टमधून मांडली आहे. ( Rajendra Pawar Message to Rohit Pawar)
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
‘१९५४ मध्ये ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले. २५ वर्षे नोकरी आणि उर्वरित २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम केले,’ असे सांगताना महाराष्ट्रात क्रॉसब्रीड गायींची ओळख, ठिबक सिंचनाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी केलेल्या कामाचा त्यांनी उल्लेख केला आहे. आप्पासाहेब पवार यांच्या सामाजिक योगदानाची दखल केंद्र सरकारने पद्मश्री देऊन घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वतःच्या संघर्षाचा उल्लेख करताना राजेंद्र पवार म्हणतात की, १९७८ मध्ये अवघे ५०० डॉलर घेऊन ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले. मात्र तेथील झगमगाटात न रमता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत परतले. शेती, सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांसाठी मुरघास, कृषिक, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग इन पोल्ट्री आदी उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्या वाटचालीचा उल्लेख करताना, कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ स्वतः नोकरी करण्याऐवजी हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत उद्योग उभा केल्याचे राजेंद्र पवार यांनी नमूद केले आहे.लहानपणी रोहित पवार मित्रांसोबत ओढ्यावर मासे, खेकडे पकडण्यासाठी जात आणि सापाचे की खेकड्याचे बिळ याचा विचार न करता त्यात हात घालत असत, असा किस्साही त्यांनी पोस्टमध्ये सांगितला आहे.
याच धाडसी वृत्तीचा संदर्भ देत ते म्हणतात, ‘तू आता राजकारणात आहेस. राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही!’ शेवटी राजेंद्र पवार यांनी मुलाला, ‘लढ, संघर्ष अटळ आहे. स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर,’ असा संदेश दिला आहे. त्यामुळे एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आलेली ही पोस्ट केवळ वडिलांचा मुलाला दिलेला सल्ला नसून, रोहित पवारांच्या राजकीय संघर्षाला बळ देणारा सूचक संदेश म्हणूनही पाहिली जात आहे.