CJPच्या आंदोलनाला राकेश टिकैतांचा पाठिंबा; शेतकऱ्यांना मोठं आवाहन
CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता आणखी जोर धरताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनाला आता शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
भारतीय किसान युनियनचे यूपी युवा प्रदेशाध्यक्ष अनुज सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ जारी करून संघटनेच्या सहभागाची माहिती दिली.
अनुज सिंह यांनी 10 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचं आवाहन केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अनुज सिंह यांनी व्हिडीओ संदेशातून मतदानाच्या अधिकाराचा मुद्दाही उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेला ‘एक मत’ हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार हे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपचे लाडके असल्याचा आरोप करत, देशात हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हे केवळ एका राजकीय पक्षाचं आंदोलन नसून सामान्य नागरिकांचं आंदोलन असल्याचा दावा अनुज सिंह यांनी केला. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबरला पूर्ण ताकदीने जंतर-मंतरवर जमा व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकरी संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर CJPकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनने आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल CJPने त्यांचे आभार मानले आहेत.
शेतकरी आणि सामान्य जनता एकत्र आल्याने लोकशाही वाचवण्याचा लढा आणखी मजबूत होईल, असा दावा CJPने केला आहे.
दरम्यान, 10 ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनात राकेश टिकैत यांच्या सहभागामुळे आंदोलनाला किती मोठं स्वरूप मिळतं, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचं ठरणार आहे.






