
Harshvardhan Sapkal
Tiger Shroff Attack Row : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता मुंबईसारख्या शहरांमध्येही सुरक्षेचा प्रश्न उदभवू लागला असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड कलाकार आणि राजकीय हस्तींवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. यावरूनच आता विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं असून पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार नेमकं करताय तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पाठबळाशिवाय गुंडांची एवढी हिंमत वाढणे अशक्य आहे,’ असा गंभीर आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले, “मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी आहे.”
“गुजरातमधील साबरमतीच्या तुरुंगात बसून गुंड जर थेट चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील, तर पोलीस यंत्रणा व भाजपा महायुती सरकार नेमके करतेय तरी काय? सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पाठबळाशिवाय गुंडांची एवढी हिंमत वाढणे अशक्य आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका करत सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे कलाकारांच्या सुरक्षेसाठी मागणी केल्याचा उल्लेखही सपकाळ यांनी केला.
याच कार्यक्रमादरम्यान कल्याणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख नसरु शेख यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं निवेदनात म्हटलं आहे. अस्लम सोयान यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या सदस्यांचं स्वागत केलं.
आता बॉलिवूडच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारकडून काय पावलं उचलली जातात आणि सपकाळ यांनी केलेल्या आरोपांबाबत अधिकृत स्तरावर काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास