
मनसेच्या 'त्या' निर्णयाने उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी; निर्णय चुकीचा म्हणत
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर गुरुवारीच महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यात राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत होता. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या निर्णयाबाबत उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते. बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात असून विविध प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत.
हेदेखील वाचा : २९ महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, तुमच्या शहराचा महापौर कोण? वाचा संपूर्ण यादी
दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या खेळीमुळे ५० नगरसेवक असलेल्या भाजपला कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी बाकावर बसावे लागेल, अशी चिन्हे दिसू लागली. शिवसेनेकडून मनसेला उपमहापौरपदासह स्थायी समिती सदस्यपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.
मनसेने निर्णय टाळायला हवा होता : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मनसे आणि ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत एक ताकदवान विरोधी गट उभा राहिला असता. मात्र, मनसेने घेतलेला निर्णय चुकीचा असून, तो टाळायला हवा होता, असे मत त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना व्यक्त केले.
आम्ही विरोधी बाकावर बसणार
आपण सध्या विरोधी पक्षात बसणार आहोत. विरोधात असलो तरी तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी पक्ष म्हणून पूर्ण प्रयत्न करू. कोणताही प्रस्ताव आला तरी त्यावर पक्ष पातळीवरच निर्णय घेतला जाईल.
– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट)
हेदेखील वाचा : Shiv Sena Party Symbol: खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेनेवर होणार अंतिम निर्णय!