
उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला
उद्धव ठाकरे यांनी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी ‘मेवा भाऊ’ असा करत उपरोधिक टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार.” भाजपाला एका वर्षात 3100 कोटी रुपये मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला. “जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा; आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
पहलगाम हल्ल्यानंतर भाजपाने पाकिस्तानवर टीका केली. मात्र, दोन महिन्यांनंतर जय शाह यांच्या आदेशानुसार भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली. यावरून भाजपाचे हिंदुत्व हे ढोंग असून त्यांचे देशप्रेमही ढोंगी आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
“संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात, मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू नायडू चालतात; पण शिवसेना मुंबईचा घास गिळू देत नाही म्हणून आम्ही चालत नाही,” असा टोला देखील त्यांनी भाजपाला लगावला.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर देखील जोरदार टीका केली. “ज्यांना मी महापालिका दाखवली, त्या गद्दारांना मंत्री करण्याचं पाप मी केलं. हे मी अभिमानाने नाही, तर शर्मेने सांगतो,” असे ते म्हणाले.
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा इतिहास आठवून दिला. तसेच पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार.” बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या सभेच्या आठवणींना उजाळा देत, “आम्ही अस्सल मराठी बोलणारे, देशभक्त हिंदू आहोत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.