Uddhav Thakare : निवडणूक आयुक्तांना अटक करा, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, सौजन्य : ,सोशल मीडिया
एसआयआर, मतदान यंत्रे यासह अनेक मुद्द्यांवरून केंद्रीय निवडणूक आयोगात उभी फूट पडल्याचे एका इंग्रजी दैनिकाने माहिती छापल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बुधवारी सकाळपासूनच निवडणूक आयोगावर विरोधकांनी टिका करण्यास सुरुवात केली. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयुक्तांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
त्याचे झाले असे की, विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अनेक निर्णय घेतल्याच्या तक्रारी त्रीसदस्यीय निवडणूक आयोगातील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याची माहिती समोर आल्याचं इंग्रजी दैनिकाच्या वृत्तात म्हटलं आहे. या घडामोडीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची मनमानी सुरू होती, याची आज पुष्टी झाली, पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार हे ज्ञानेश कुमार आहेत. आज ज्ञानेश कुमारांचा विद्रूप चेहरा सर्वांच्या समोर आला आहे. तातडीने ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
मागील काही वर्षांपासून आम्ही सर्व विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. आज ते खरं होताना दिसत आहे. आज ज्याला खरं बंड म्हणतात, निवडणूक आयोग हा या दोन (संधू आणि जोशी) आयुक्तांचा झाला आहे. त्यामुळे या दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आयोगातून काढलं आहे असं मानायला हरकत नाही. कारण या दोन आयुक्तांचं बहुमत झालं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टिका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतात एक टोळी हैदोस घालत आहे. ही टोळी राजकीय पक्ष फोडणं, दुसऱ्यांचे राजकीय पक्ष चोरणं, लोकशाहीचा खून करणं, असे कारभार करते. या टोळीचा मुख्य सूत्रधार हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. त्यामुळे तातडीने ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाकलं पाहिजे.
ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती? हे लोकांना आता कळलं आहे. असं बोललं जातं की निवडणूक आयोग केंद्रीय गृहखात्याच्या सूचना मानतो. मग याचे सूत्रधार गृहमंत्री आहेत का? याचाही खुलासा झाला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.






