vandalizing Devendra Fadnavis mantralaya office
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. एका महिलेने काल (दि.26) ही तोडफोड केली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्रालयात कडेकोट बंदोबस्तही असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची हा महिलेने मोठी नासधूस केली. बोलण्यातून आपला रोष व्यक्त करत या महिलेने फडणवीस यांचे नावाचे फलक फोडत आणि त्यांचे कार्यालय फोडले. यावरुन आता राजकारण सुरु असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीकडून महिलावर्गाला लक्ष्य केले जात आहे. महिलांसाठी निवडणूकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना देखील आणण्यात आली आहे. त्यानंतर आता एका माहिलेने देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय फोडल्यामुळे विरोधकांनी टीका केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या तोडफोडीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “राज्य सरकारकडून लाडकी बहीणांच्या नावावरुन नवीन नवीन इव्हेंट केले जात आहेत. आता लाडक्या बहिणींची मतं मिळवण्यासाठी हे जे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हीच लाडकी बहीण किती रागात आहे आणि लाडक्या बहीणीच्या मनामध्ये किती चीड आहे, हे दिसलं आहे. या रागामुळे लाडक्या बहीणीने मंत्रालयामध्ये घुसून सहाव्या मजल्यावर जात तोडफोड केली आहे. तुम्ही किती नालायक आहात आणि सत्तेवर बसण्यासाठी लायकीचे नाही, हे दाखवून दिले आहे. आता मंत्रालयामध्ये जाऊन पाटी काढली आहे, उद्याचा तिचा राग अनावर झाला तर त्यांच्या डोक्यावर पाटी हानेन,” असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मंत्रालयातील ६ व्या माळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे.
याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करतांना व्हिडीओत दिसत आहे.
एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने… pic.twitter.com/XcOpjwRyME
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 27, 2024
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आता या गोष्टीवरुन दिसत आहे की कायदा व सुव्यवस्थेबाबत काय धिंडवडे उडत आहेत? कशाप्रकारे प्रकरणं हाताळली जात आहेत? कोणाचा कसा हात आहे? कसा कोणाशी काहीही पायपोस नाहीये, हे दिसून आले आहे. असा प्रकार हा महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यामध्ये व्हावं, यावर सत्ताधारी नेते सावरासावर करताना दिसत आहेत. हे लोकांना अपेक्षित नाही. लोकं चिडलेली आहेत. राज्यामध्ये निवडणूका फार जवळ आल्या आहेत, त्यामुळे लोकं निवडणूकांसाठी वाट पाहत आहेत,” असे मत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केले आहे.
एखादी बहीण चिडली असेल तर…
मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, “कार्यालयात तोडफोड झाल्याची घटना कालची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरीता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगणतेमधून तिने हे कृत्य केले का? किंवा तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. काही लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ.” असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.