
मतदारराजा ठरवणार २९ महापालिकांचे भाग्य
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचे मतदान आज घेतले जाणार आहे. पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. मतदान पार पडल्यानंतर उद्या शुक्रवारी (दि.16) ला निकाल जाहीर केले जाणार आहेत.
राज्यातील महापालिकांच्या या महाकुंभात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यातील लढतींवर तर भाजप-शिवसेना विरोधात ब्रँड ठाकरे असा जंगी सामना रंगणार आहे. तर, उपराजधानी नागपुरात विजय मिळवणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आपली शक्ती केंद्रित केली. अनेक नेत्यांचे राजकीय भविष्य ठरवणारी आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी अशी ही महापालिका निवडणूक असणार आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Traffic : मुंबईतून प्रवास करण्यासाठी महत्त्वाची सूचना, ‘या’ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्बंध, काय आहेत पर्यायी मार्ग
मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण १०३४४३१५ मतदार आहेत, ज्यात ५५१५७०७ पुरुष, ४८२६५०९ महिला आणि १०९९ इतर मतदार आहेत. मतदानादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. २८००० पोलिस कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने वरिष्ठ अधिकारी तैनात केले जातील.
पुण्यातही प्रशासनाकडून तयारी पूर्ण
पुणे महानगरपालिकेसाठी (PMC Elections 2026) गुरुवारी (दिनांक 15) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुणे शहरावर (Pune News) वर्चस्व ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांमध्येच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
हेदेखील वाचा : Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील २९ महापालिकांसाठी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात