
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत 'तुतारी'च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर? (फोटो सौजन्य-X)
राष्ट्रवादीचे (शरद पवार) नगराध्यक्षपदाचे उमेदवार परवीन खलील कुरेशी या त्यांचे पती खलिफा उर्फ खलील कुरेशी यांची मुस्लिम समाजात असलेली उजळ प्रतिमा त्यांना फायदेशीर ठरणारी आहे. मुस्लिम समाजासह दलित, ओबीसी आणि अन्य समाजात असलेले त्याचें सौहार्दपूर्ण संबंध यामुळे त्यांचे निवडणुकीतील प्राबल्य वाढले आहे. या निवडणुकीत मुस्लिम समाजाची मतदारसंख्या सर्वाधिक जवळपास २३ हजार असून त्या खालोखाल ओबीसी आणि मराठा अनुक्रमे जवळपास २१ व २० हजार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यावरून खलिफा यांच्या संबंधामुळे मुस्लिम समाजाचे एकगठ्ठा मतदान त्यांनी घेतल्यास निवडणुकीचे चित्र बदलू शकते. मुस्लिम समाजाचे मतदान गेमचेंजर मतदान ठरू शकते.
दरम्यान शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रभागातील उमेदवारांना सोबत घेऊन प्रत्येकाला व्यक्तिशः भेटत त्यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली भल्या सकाळपासून रात्री प्रचार संपेपर्यंत त्यांची यंत्रणा काम करत असल्याचे चित्र आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिनसल्याने राष्ट्रवादीने (शरद पवार) नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी तब्बल बत्तीस उमेदवार निवडणुकीच्या मैदान उतरवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी महाविकास आघाडीची मते खेचण्यासाठी ही फूट पाडत राष्ट्रवादीला (शरद पवार) स्वतंत्र लढविण्यास विरोधक म्हणजे भाजपाने फूस लावल्याचा आरोप खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर केला होता.
मात्र जागावाटपासाठी झालेल्या अनेक बैठकावेळी शिवसेनेने (उबाठा) आम्हाला पाच पेक्षा अधिक जास्त जागा देणार नसल्याचे अडमुठे धोरण स्वीकारले होते. आम्ही दहा ते बारा जागांची मागणी केली होती. आम्ही सात ते आठ जागांवर समाधान मानले असते. पण ते पाच जागांच्या पुढे एकही जागा आम्हाला देण्यास तयार नसल्याने नाईलाजाने आम्हाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून परवीन कुरेशी यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय गणित बदलले आहे. कुरेशी यांची या निवडणुकीतील उमेदवारी गेमचेंजर ठरणारी असून निवडणुकीचा हा गेम कसा चेंज होईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.