फराळ, रांगोळी यांप्रमाणेच महत्व आहे ते अभ्यंग स्नानाला. दिवाळीची पहिली अंघोळ याला हिंदू धर्मात शुभ मानलं जातं. याचे अध्यात्मिक आणि शास्त्रीयदृष्टीकोन देखील आहे. भारतीय संस्कृती आणि सणवार हे ऋतूचक्रावर आधारित आहेत. दिवाळीतच अभ्यंगस्नान का करतात याबाबत जाणून घेऊयात.दिवाळीतील अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही, तर ती शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करणारा एक पवित्र विधी आहे, असं म्हटलं जातं.यामागे शास्त्रीय, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक कारणं आहेत.
अभ्यंगस्नानाचा उल्लेख आयुर्वेदात “स्नेह स्नान” म्हणून देखील केला आहे. दिवाळीच्या काळात हवामान बदलतं शरद ऋतूची चाहूल लागून थंडीची सुरुवात होते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्या वेळी शरीरावर तिळाचं, नारळाचं किंवा बदामाचं तेल लावून स्नान करणं म्हणजे पारंपरिक पद्धतीने दिवाळीत एका अर्थी स्कीन केअर करण्यासारखं आहे. तेलाने केलेल्या मसाजमुळे त्वचेला पोषण मिळतं. शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना बळकटी मिळते. तिळाचं तेल ऊष्ण गुणधर्माचं असल्याने थंडीपासून शरीराचं संरक्षण होतं.
दिवाळीच्या नरकचतुर्दशीच्या दिवशी केलेलं अभ्यंगस्नान हे पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की, या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नवीन वर्षाच्या आरंभाला शुद्धता लाभते. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केलं. त्यामुळे अभ्यंगस्नान हे पाप आणि दुःख नष्ट करून आनंद व समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दिवाळी म्हणजे नरकासूरावर विजय मिळवून साजरा करण्यात येणारा दिवस. त्यामुळे या दिवशी पहाटे उठून अंघोळ करणं शुभ मानलं जातं.
अभ्यंगस्नानानंतर शरीर ताजंतवानं होतं, मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवसभरासाठी उत्साह, आत्मविश्वास आणि शांततेची भावना टिकते.अभ्यंगस्नान हे आरोग्य, सौंदर्य आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण आहे, म्हणूनच दिवाळीच्या सकाळीचं हे स्नान “शुभारंभ” मानलं जातं.अभ्यंगस्नान हे फक्त शरीर शुद्ध करणं नाही, तर मनाचं देखील शुद्धीकरण केलं जातं. तेल मालिश आणि उटणं लावल्याने शरीराला उब मिळते, सुगंध मेंदूला प्रसन्न ठेवतो आणि सणाची सुरुवात आनंदाने होते. या प्रक्रियेनंतर नवीन वस्त्र परिधान करणं म्हणजे जुन्या उर्जेचा त्याग आणि नवीन सकारात्मक उर्जेचं स्वागत. याचकारणाने : दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व अध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून दिलं जातं.