
फोटो सौजन्य- pinterest
फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. या दिवशी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्यास उपस्थित असतात. तीन दिवस होणाऱ्या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा अद्भुत आहे. संत एकनाथ महाराज म्हणजे नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे. नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी! नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला. वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले. नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते. नाथांची भक्ती एवढी होती की, साक्षात पांडुरंग नाथांच्या घरी श्रीखंड्या बनून राहिले पाणी भरले आहे. जेवण बनवले.
नाथषष्ठीला भानुदास, एकनाथ नाम घोषणांच्या गदारोळाने पैठणचा आसंत भरून जातो. समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला. नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावोगावी होतो. श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारीनंतर या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, “भानुदास-एकनाथ”चा गजर यामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमीला हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरुवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीने वारकरी व हरिदासी कीर्तने करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.
सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.
त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ‘दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपआपल्या पद्धतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: एकनाथषष्ठी हा संत एकनाथ महाराजांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा धार्मिक उत्सव आहे. या दिवशी त्यांच्या जीवनकार्याचे आणि भक्तीपर परंपरेचे स्मरण केले जाते.
Ans: या दिवशी कीर्तन, भजन, पालखी सोहळा, अभंग गाणे आणि धार्मिक प्रवचन असे कार्यक्रम आयोजित केले जातात
Ans: महाराष्ट्रातील पैठण येथे संत एकनाथ महाराजांची समाधी असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो.