फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले जेजुरी हे खंडोबाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र असलेले स्थान मानले जाते. ‘येलकोट येलकोट जय मल्हार’च्या जयघोषात न्हाऊन निघणारी ही नगरी भक्ती, परंपरा आणि इतिहासाचा अद्वितीय संगम आहे. जेजुरीतील खंडोबा मंदिर आणि त्याच्याशी जोडलेला कडेपठार हा परिसर धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
जेजुरीतील प्रसिद्ध असलेलं खंडोबा मंदिर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण खंडोबा यांच मूळ मंदिर सासवड जवळ असलेल्या डोंगरमाथ्यावर बसलेले आहे. उंच पठारावर बसलेले हे मंदिर म्हणजेच कडेपठार. निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे इथे आल्यावरती एक वेगळीच प्रसन्नता आणि समाधान अनुभवायला मिळते. या मंदिरात विराजमान असलेले खंडोबा हे भगवान शिवाचे एक उग्र आणि पराक्रमी रुप मानलं जातं. लोकांच्या श्रद्धेनुसार मणी आणि मल्ल या राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार माजवला होता. देव ऋषी त्रस्त होऊन भगवान शिवाची प्रार्थना करू लागले तेव्हा त्यांनी खंडोबाच्या रुपात अवतार घेऊन या राक्षसाचा संहार केला. हे युद्ध कडेपठार परिसरात झाल्याची मान्यता असल्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रथेमुळे कडेपठार हे फक्त मंदिर नसून चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवणारा पवित्र असा स्मारक मानलं जातं. मंदिराची रचना साधी असली तरी त्यात एक वेगळचं दैवी तेज जाणवतं. डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे येथून आसपासच्या परिसराचा देखना नजारा दिसतो. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला इथले वातावरण शांत आणि भक्तिमय असतं. त्यामुळे येथे अनेकजण फक्त दर्शनासाठीच नाही तर मनःशांती आणि ध्यानासाठी देखील येतात.
कडेपठार मंदिरात वर्षभर भक्ताची वर्दळ असते पण चंपाषष्ठी या सणाला येथे मोठी जत्रा भरते. या दिवशी हजारो भाविक खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. पूजा, आरती, भजन आणि धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने भरून जातो. अनेक जण येथे नवस देखील बोलतात आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यावरती परत येऊन देवाचे आभार मानतात. इथे अभिषेक करण्याची परंपरा आहे. पाणी, दूध किंवा पंचामृताने देवाला स्नान घालून पूजा केली जाते. त्यानंतर फुले, बेलपत्र आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या विधीमुळे मन शुद्ध होतं आणि देवाची कृपा मिळते, असं मानलं जातं.
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सासवड मार्गे जावं लागतं. शेवटचा काही भाग हा डोंगर चढून जावा लागतो. त्यामुळे हा प्रवास थोडा श्रमाचा असला तरी वर पोहोचल्यावर मिळणारा अनुभव अत्यंत समाधानकारक असतो. निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा याचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. कडेपठार हे मंदिर धार्मिक स्थळ नसून मनाला शांतता देणारं आणि श्रद्धेला बळ देणारं एक अध्यात्मिक स्थान आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला खंडोबाच्या कृपेचा आणि त्या पवित्र वातावरणाचा एक वेगळाच अनुभव मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: खंडोबा हे भगवान शिवाचे उग्र आणि पराक्रमी रूप मानले जाते. ते मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करणारे देव म्हणून ओळखले जातात.
Ans: खंडोबा हे भगवान शिवाचे उग्र आणि पराक्रमी रूप मानले जाते. ते मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करणारे देव म्हणून ओळखले जातात.
Ans: कडेपठार हे सासवडजवळील डोंगरमाथ्यावर वसलेले खंडोबाचे प्राचीन मंदिर आहे, ज्याला मूळ स्थान मानले जाते.






