
फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. महागौरीचे रूप शांत, सौम्य आणि करुणामय मानले जाते. भक्त देवीची पूजा करून जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, मनाला शांती मिळावी आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करतात. महागौरी देवीची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया
आज रविवार, १८ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. महागौरी हे नवदुर्गेचं आठवं रुप मानलं जातं. महागौरी म्हणजेच अत्यंत गौरवर्णीय आणि तेजस्वी असं स्वरुप. देवीला शांतता, सौभाग्य, समृद्ध आणि पावित्र्यतेचं स्वरुप मानलं जातं.
यंदा नवरात्रीच्या आठव्या दिवशी जांभळा रंग आहे. हा रंग आध्यात्मिकता, आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि सकारात्मक उर्जेशी जोडला जातो. हा रंग मनाला स्थैर्य देतो आणि अंतमुख होऊन स्वतःकडे पाहण्याची प्रेरणा देतो त्यामुळे या दिवशी जांभळ्या रंगांचे कपडे परिधान करून महागौरीची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
महागौरीला नारळाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. नारळाला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानलं जातं आणि ते शुद्धतता आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. नारळासोबतच दुधाची खीर, नारळाच्या वड्या, नारळाची पोळी किंवा नारळापासून तयार केलेला सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवता येतो. ओम देवी महागौरेय नमः हा महागौरीचा प्रचलित असा मंत्र आहे.
अष्टमीच्या दिवशी देवीसमोर दिवा लावून मन शांत ठेवून या मंत्रांचा जप करता येतो. अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करून घरातील सुख शांती आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी कन्या पूजन करण्याची देखील परंपरा आहे. कन्यांना देवीचं रुप मानून त्यांना भोजन आणि भेटवस्तू देण्याची अनेक ठिकाणी प्रथा आहे.
देवी महागौरी ही नवदुर्गेचे आठवे रूप मानली जाते. पौराणिक कथांनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे तिच्या शरीराचा रंग काळवंडला होता. त्यानंतर भगवान शिवांनी गंगाजलाने तिला स्नान घातले आणि तिचे रूप अत्यंत तेजस्वी व गौरवर्णीय झाले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे तिला महागौरी हे नाव मिळाल्याची धार्मिक मान्यता आहे. महागौरीचे रूप शांत, सौम्य आणि करुणामय मानले जाते. भक्त देवीची पूजा करून जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, मनाला शांती मिळावी आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)