
याबाबत श्री स्वामी समर्थ यांच्यावर लिहिलेल्या बखरमध्ये दिलेल्या संदर्भानुसार गोष्ट अशी की, अक्कलकोटमध्ये शेषचार्य अग्निहोत्री म्हणून एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. ते भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. या ब्राह्मण गृहस्थाचं श्री स्वामी समर्थांवर खूप प्रेम आणि अपार श्रद्धा होती. स्वामींच्या दर्शनास येताना अग्नीहोत्री बुवा तपकिरीची डबी आणायचे. अग्नीहोत्री बुवांनी तपकीर पुढे करावी आणि स्वामींनी ती चिमूटभर ओढावी. असे त्यांचे नित्य चालत असे. जेव्हा स्वामी रागावले असत तेव्हा भल्याभल्यांना मठात स्वामींना सामोरं जाण्याची भीती वाटत असे पण अग्नीहोत्री बुवा कसलीही भीती न बाळगता त्यांचे दर्शन घेत असत.
मठात आल्यावर स्वामींच्या लोकं पुढ्यात पेढे आणि गोडाधोडाचं काही ना काही नैवेद्य म्हणून ठेवत. स्वामी ते गाई गुरांना खायला देई वाटसरुंना देई. पण अग्निहोत्री बुवांना कधीच त्यांनी पेढा दिला नाही. बुवांना याचं वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशीपासून तर बुवांच दर्शनपण बंद झालं. बुवा दर्शनासाठी आल्यावर स्वामी पांघरूण घेऊन झोपत असे. कित्येकदा अग्नीहोत्री बुवा स्वामींच्या दर्शनासाठी त्यांची वाट पाहत राहायचे. पण स्वामी मात्र त्यांना कधीच दर्शन देत नव्हते. हे असं खूप दिवस सुरु होतं. अग्नीहोत्री बुवांना स्वामींच्या या वागण्याचं काही कारण कळत नव्हतं.
एकदा अग्नीहोत्री बुवा शेणाचे गोळे करत होते. हे गोळे करताना त्यांच्या मनात तेव्हाही हाच विचार आला की, असं झालं तरी काय की स्वामींनी माझ्यावर राग धरला त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं का ? त्यावेळी अग्नीहोत्री बुवा विचार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, स्वामींजवळ आपण पेढा मागितला हा अपराध झाला.
ज्या ठिकाणी मानवी जीवनाला मोक्ष मिळतो तिथे मी साध्या पेढ्याचा मोह धरला. अग्निहोत्री बुवांनी स्वामींची क्षमा मागितली. तेव्हा स्वामी अग्नीहोत्री बुवांना पाहून हसले. इतके दिवस दर्शन न देणारे स्वामी आज आपल्याला पाहून हसले याने अग्निहोत्री बुवा तृप्त झाले. थोडक्यात काय तर देवाच्या दारात कोणत्याही अपेक्षेने न जाता आजवर जे मिळालं त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. ही स्वामी समर्थांची शिकवण या गोष्टीतून मिळते.