तिरुपती मंदिर समितीत मोठी उलथापालथ, हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं, नेमकं कारण काय?
आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे. या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्यासमोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, असे दोन पर्याय ठेवले आहेत. या निर्णयाची सध्या देशभर चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. त्यामुले एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं आहे.
जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे आणि TTD अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे. एका राष्ट्रीय वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत TTD च्या नियमांमध्ये तीनवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. १९८९ मध्ये या मंदिराशी संबंधित एक आदेश होता, या आदेशात, मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर फक्त हिंदूंचीच नियुक्ती झाली पाहिजे, असं नमूद करण्यात आलं आहे. २०२४ मध्ये आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचं सरकार आलं.
त्यानंतर कथितरित्या तिरुमला तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या काहींनी त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या धर्माच्या लोकांचे सहकारी आहात असं बोललं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. दरम्यान मंदिर प्रशासनात काम करणाऱ्या पण हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान या मंदिर प्रशासकीय सेवेत जे ७ हजार कर्मचारी कायमस्वरुपी तत्त्वावर नोकरी करतात त्यांच्यापैकी ३०० कर्मचारी इतर धर्माचे आहेत. त्यामुळे त्यांना बदली घ्यावी लागणार आहे किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागणार आहे.
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १६ (५) वर आधारित आहे. संविधानातील या तरतुदीनुसार धर्मसंस्था, मंदिरं, धार्मिक स्थळं या ठिकाणी त्याच धर्माचे लोक नोकरीसाठी असावेत. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मंदिर समितीच्या या निर्णयाची देशभर चर्चा आहे.