फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळशीला केवळ एक वनस्पती म्हणून नाही तर देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. कार्तिक पक्षातील शुक्ल पक्षातील द्वादशीला अनेक ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो.
काही ठिकाणी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालीग्राम स्वरुपाशी किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो. या विवाहामागे सुद्धा एक अतिशय रंजक आणि भक्तिभावाने भरलेली अशी पौराणिक कथा आहे.
या पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाची एक अत्यंत पतीव्रता आणि विष्णू भक्ती स्त्री होती. तिचा विवाह जालंधर नावाच्या पराक्रमी असुराशी झाला होता. वृंदा ही अत्यंत धार्मिक आणि पतीवरती निष्ठा ठेवणारी स्त्री होती. तिच्या पतीव्रता धर्माच्या सामर्थ्यामुळे जालंधराला सुद्धा मोठं संरक्षण मिळालं होतं. त्यामुळे देवतांना ही त्याचा पराभव करण कठीण झालं होतं. जालंधरच्या वाढत्या अत्याचारामुळे सर्व देवता चिंतेत पडले त्याचा पराभव करण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली.
जालंधरचे सामर्थ्य वृंदाच्या पतीव्रता धर्मामुळे टिकून असल्याचं भगवान विष्णूंना सुद्धा माहीत होतं. भगवान विष्णूंनी जालंधराच रुप धारण करून वृंदाच्या समोर प्रवेश केला. आपल्या पतीचं रुप पाहून वृंदेचा पतीव्रता धर्म भंग झाला आणि त्यावेळी युद्धात जालंधरचा वध झाला. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर वृंदा दुखी झाली तिने भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्हालाही पत्नीपासून वियोग सहन करावा लागेल. या शापाचा संबंध पुढे प्रभू श्रीरामांच्या अवतारातील सीतेशी देखील जोडला जातो.
यानंतर वृंदेने आपले प्राण त्यागले तिच्या भक्तीने आणि पतीव्रता धर्माने प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला. तू तुळशीच्या रुपात पृथ्वीवरती पुजली जाशील आणि माझ्या पूजेमध्ये तुझ्या पानांशिवाय नैवेद्य किंवा पूजा पूर्ण झाली असं मानलं जाणार नाही. असं मानलं जातं, वृंदेच्या स्मरणार्थ भगवान विष्णूंनीसुद्धा शालीग्राम स्वरुप धारण केलं आणि कार्तिक महिन्यात त्यांचा तुळशीची विवाह लावण्याची परंपरा सुरू झाली.
तुळशी विवाह हा धार्मिक विधी नसून त्यातून निसर्ग आणि श्रद्धा यांच्यातील नातंसुद्धा अधोरेखित होतं. या दिवशी तुळशीच्या रोपाला सुंदर सजवलं जातं. तुळशीवृंदानाला रांगोळी, फुलांच्या माळा आणि दिव्यांनी सजवलं जातं. तुळशीला एका वधूप्रमाणे सजवून भगवान विष्णूंच्या शालीग्राम स्वरूपाशी तिचा विवाह लावला जातो. मंगलआष्टिका म्हटली जातात आणि विवाहाचा हा सोहळा पार पडतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला अनेक ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो.
Ans: पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या विष्णुभक्त स्त्रीच्या भक्ती आणि पतिव्रता धर्माशी तुळशी विवाहाची कथा जोडलेली आहे.
Ans: तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपाशी किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो.






