
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू परंपरेनुसार भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असणारा पवित्र सण रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण हा केवळ धार्मिक विधी नसून तो विश्वास, रक्षण आणि भावनिक बंधनाचा अनमोल सण आहे. रक्षबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि यश लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना करते. तर भाऊ तिला जीवनभर रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र यावेळी श्रावण पौर्णिमा २७ आणि २८ या दोन्ही दिवशी असल्यामुळे रक्षाबंधनाचा सण नेमका कधी साजरा केला जाणार आहे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. रक्षाबंध नेमके कधी आहे, राखी कधी बांधावी आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथीची सुरुवात गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी सुरू होणार आहे तर, शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. उदय तिथीनुसार, शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.
राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम वेळ शुक्रवार २८ ऑगस्ट सकाळी ०५:५७ ते सकाळी ०९:४८ वाजेपर्यंत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ ते रात्री ९:३२ वाजेपर्यंत ‘भद्रा’ काळ असणार आहे. त्यामुळे २७ ऑगस्टला दिवसभर राखी बांधणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. २८ ऑगस्ट रोजी कोणताही भद्रा दोष नसून, संपूर्ण दिवस आनंदात रक्षाबंधन साजरे करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.
पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या रक्षाबंधनाचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहिणे भावाला टिळा लावून, ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
या सणाचा संबंध महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या कथेशी संबंधित आहे. ज्यावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता, त्यावेळी द्रौपदीने कसलाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून, तो कपडा त्याच्या बोटाला बांधला होता. या उपकाराची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटसमयी रक्षणाचे वचन दिले होते आणि कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिची लाज राखून ते वचन पूर्ण केले होते.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रक्षाबंधनाच्या दिवशी होत असले तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सुतक काळही नसेल. सुतक काळ नसल्यामुळे रक्षाबंधन साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. चंद्रग्रहण सकाळी ६:५५ वाजता सुरू होणार आहे आणि खंडग्रास चंद्रग्रहण दुपारी १२:३० वाजता संपेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)