
उच्च सिंधू खोऱ्यात कार्बन शोषणापेक्षा उत्सर्जन तीनपट
आयसर पुणेचे राकेश कुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली ‘ड्युअल-आयसोटोपिक (δ³⁴S आणि δ¹⁸O) एव्हिडन्स फॉर नेट कार्बन डाय-ऑक्साइड रिलीज फ्रॉम द नॉर्थवेस्टर्न हिमालयन कॅचमेंट्स’ हा अभ्यास करण्यात आला. गायना रंजन त्रिपाठी, सत्यव्रत दास, अच्युत वेणुगोपाल, नितीश कुमार, संतोष कुमार राय आणि अभयानंद सिंह मौर्य हे संशोधकही यात सहभागी आहेत.
पावसाचे पाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतल्यावर तयार होणारे सौम्य आम्ल खडकांवर परिणाम करते. विशेषतः सिलिकेट खडकांच्या झीज प्रक्रियेत वातावरणातील कार्बन दीर्घकाळासाठी साठवला जाऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया कार्बन कमी करणारी नैसर्गिक यंत्रणा मानली जाते.
मात्र, उच्च सिंधू खोऱ्यात पायराइटमुळे परिस्थिती बदलते. पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पायराइटचे ऑक्सिडीकरण होते. त्यातून तयार होणारे सल्फ्युरिक आम्ल कार्बोनेट खडकांवर परिणाम करते. परिणामी, खडकांमध्ये साठलेला कार्बन वातावरणात परत जाण्यास मदत होते.
ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी संशोधकांनी उच्च सिंधूच्या उगम क्षेत्रातील नद्यांच्या पाण्याचे ५० नमुने तपासले. त्यातील सल्फेट आणि गंधक-ऑक्सिजन समस्थानिकांचा अभ्यास करण्यात आला. विश्लेषणानुसार, या पाण्यातील सल्फेटपैकी सुमारे ६८ टक्के हिस्सा पायराइटसारख्या सल्फाइड खनिजांच्या ऑक्सिडीकरणातून येतो. सिलिकेट खडकांचा वाटा सुमारे १२ टक्के आहे.
हिमालयातील तीव्र खडकझीज आणि मोठ्या प्रमाणातील हिमनदी आच्छादनामुळे पायराइटच्या ऑक्सिडीकरणाला चालना मिळते. हिमनद्यांचे सरकणे आणि वितळलेल्या पाण्यामुळे खडकांचा नवा पृष्ठभाग उघडतो. त्यामुळे पाणी आणि ऑक्सिजनशी संपर्क वाढून रासायनिक प्रक्रिया वेगाने होते.
अभ्यासानुसार, उच्च सिंधूच्या पर्वतीय भागात दर चौरस किलोमीटर क्षेत्रातून वर्षाला सुमारे १.४ लाख मोल कार्बन डायऑक्साइडचे शोषण, तर ४.४ लाख मोल उत्सर्जन होते. म्हणजेच शोषणापेक्षा उत्सर्जन तीनपट अधिक आहे. त्यामुळे हा हिमनदीयुक्त प्रदेश कार्बन शोषणारा ‘सिंक’ न राहता निव्वळ कार्बन स्रोत ठरतो. हिमालयाच्या हवामानातील भूमिकेचा अभ्यास करताना पायराइटसारख्या खनिजांच्या झीज प्रक्रियेचाही विचार करणे आवश्यक असल्याचे संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
सह्याद्री फुलला! रानफुलांचा रंगोत्सव बहरला; काळ्याकभिन्न कातळांवरील हिरव्या गालिच्यावर…
पायराइटला ‘फूल्स गोल्ड’ म्हटले जाते. त्याचा सोनेरी-पिवळा रंग आणि चमक यामुळे पूर्वी अनेकांना ते सोने असल्याचा भास होत असे. मात्र, पायराइट हे लोह आणि गंधकापासून बनलेले खनिज आहे. पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर त्याची रासायनिक झीज होते. या प्रक्रियेत तयार होणारे आम्ल कार्बोनेट खडकांवर परिणाम करू शकते आणि त्यातून कार्बन वातावरणात मुक्त होण्यास हातभार लागू शकतो.