सह्याद्रीत रानफुलांचा मोसम (फोटो- सोशल मिडिया)
सह्याद्रीत रानफुलांचा हंगाम बहरला
निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांची पावले वळली सह्याद्रीकडे
असंख्य रानफुलांच्या रंगांची उधळण पाहायला मिळतेय
सुनयना सोनवणे / पुणे: पावसाने वेग घेताच सह्याद्रीत रानफुलांचा हंगाम बहरला आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम घाटातील घाटमाथे, पठारे आणि डोंगरउतार विविधरंगी रानफुलांनी फुलले आहेत. काळ्याकभिन्न कातळांवरील हिरव्या गालिच्यावर पिवळी सोनकी, जांभळा तेरडा, पांढरी बटनफुले, निळी उट्रिक्युलरिया अशा असंख्य रानफुलांच्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काही आठवड्यांसाठीच खुलणाऱ्या या क्षणभंगुर सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांची पावले सह्याद्रीकडे वळत आहेत.
रानफुले म्हणजे मानवी हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या वनस्पती. पावसाच्या विशिष्ट काळातच त्यांचा बहर येतो आणि काही दिवसांतच त्यांचे जीवनचक्र पूर्ण होते. जुलै ते सप्टेंबर हा रानफुलांचा बहराचा सर्वोच्च काळ मानला जातो. पश्चिम घाट हा जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. येथे आढळणाऱ्या अनेक वनस्पती स्थानिक (एन्डेमिक) असून त्या जगात इतरत्र आढळत नाहीत. या रानफुलांवर मधमाशा, फुलपाखरे आणि इतर परागीभवन करणारे कीटक अवलंबून असतात. त्यामुळे ही फुले केवळ निसर्गसौंदर्य नव्हे, तर संपूर्ण परिसंस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत.
Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा
मात्र, गेल्या काही वर्षांत रानफुले पाहण्यासाठी होणाऱ्या अनियंत्रित पर्यटनामुळे या नाजूक अधिवासावर ताण वाढत आहे. फुलांवरून चालणे, ऑफरोडिंग, प्लास्टिक कचरा आणि अति गर्दीमुळे अनेक दुर्मीळ वनस्पती धोक्यात येत आहेत. त्यामुळे रानफुलांचा आनंद घेतानाच त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी असल्याचे वनस्पती अभ्यासक सांगतात.
सह्याद्रीत कोणती रानफुले पाहायला मिळतात?
सोनकी, स्मिथिया, तेरडा, उट्रिक्युलरिया, इरिओकॉलॉन (बटनफूल), ड्रोसेरा, कारवी, विविध ऑर्किड्स ही सह्याद्रीच्या पावसाळी जैवविविधतेची ओळख मानली जातात.
पुण्याजवळ रानफुले पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे –
– ताम्हिणी घाट
– भीमाशंकर अभयारण्य
– सिंहगड परिसर
– राजगड–तोरणा
– पानशेत परिसर
– लोणावळा परिसर
– कास पुष्पपठार (सातारा)
फुलांना बहर! मागणी अन दरही वाढले ; कापरी, झेंडू, तिळाच्या फुलांची आवक
रानफुले ओळखायची कशी?
– मोबाईलच्या मॅक्रो मोड किंवा कॅमेऱ्याने फुलाचा क्लोजअप आणि पानांसह संपूर्ण वनस्पतीचा फोटो घ्या.
– अनेक फुले सारखी दिसतात. त्यामुळे पाने, खोड आणि फुलाचा आकार ओळखीसाठी महत्त्वाचा ठरतो.
– छायाचित्रांच्या आधारे पुस्तके, संकेतस्थळे किंवा तज्ज्ञांच्या मदतीने फुलाची ओळख पटवता येते.
– प्रत्येक रानफुलाचे शास्त्रीय नाव, कुल (फॅमिली) आणि मराठी नाव अशी तीन प्रमुख नावे असतात.
– रानफुले तोडण्याऐवजी त्यांची छायाचित्रे घ्या आणि जैवविविधतेचे संवर्धन करा.
रानफुले पाहताना…
– फुले तोडू नका.
– ठरवून दिलेल्या वाटेवरूनच चालावे.
– प्लास्टिक किंवा इतर कचरा टाकू नका.
– ऑफरोडिंग टाळा.
– ‘फोटो घ्या; फुले नाही’ हा नियम पाळा.
‘ रानफुले ही केवळ पर्यटनाचे आकर्षण नाहीत, तर पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा पाया आहेत. शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच या रानफुलांचे पर्यावरणीय मूल्य जपणे तितकेच आवश्यक आहे. मधमाशा, फुलपाखरे आणि विविध कीटक प्रजाती परागीभवनासाठी या मोसमी रानफुलांवर अवलंबून असतात. त्यामुळे रानफुलांचा बहर हा केवळ निसर्गसौंदर्याचा आविष्कार नसून संपूर्ण परिसंस्थेच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. या अधिवासाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’
-डॉ. सचिन पुणेकर, वनस्पती शास्त्रज्ञ






