
Eucalyptus trees groundwater depletion Marathi
दिसायला अतिशय सुंदर, उंच आणि नेहमी हिरवीगार दिसणारी निलगिरीची (Eucalyptus) झाडे आज भारतापासून ते लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेपर्यंत सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय बनली आहेत. वेगाने वाढणारे लाकूड आणि कागद उद्योगासाठी लागणारा लगदा (Pulp) मिळवण्यासाठी जगातील अनेक देशांनी गेल्या काही दशकांत निलगिरीच्या लागवडीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. मात्र, या नफ्याच्या मोहापोटी निसर्गाचा मोठा समतोल बिघडला आहे. जगभरातील चार प्रमुख देशांमध्ये झालेल्या नुकत्याच शास्त्रीय संशोधनातून असे समोर आले आहे की, ही झाडे जमिनीतील संपूर्ण पाणी आणि पोषक तत्त्वे शोषून घेऊन आजूबाजूच्या प्रदेशाला वाळवंट बनवत आहेत.
भारतातील पर्यावरणप्रेमी आणि शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून निलगिरीच्या लागवडीविरोधात आवाज उठवत आहेत. आता आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या अहवालाने भारतातील या चिंतेला पुष्टी दिली आहे. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये झालेल्या अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की, निलगिरीच्या विस्तीर्ण लागवडीमुळे नैसर्गिक जलस्रोत वेगाने आटत चालले आहेत.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये कागद आणि लगदा उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर निलगिरीची झाडे लावली गेली. तेथील मिनास गेराइस प्रांतात शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, अवघ्या ४५ वर्षांच्या काळात तेथील भूजल पातळी तब्बल ४.५ मीटरने खाली गेली आहे. स्थानिक लोकांनी या निलगिरीच्या लागवडीला आता ‘हिरवे वाळवंट’ (Green Desert) असे नाव दिले आहे, कारण वरून जरी हिरवळ दिसत असली तरी खाली जमिनीमध्ये पाण्याचा एक थेंबही उरलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
दुसरीकडे, अर्जेंटिनाच्या पम्मास गवताळ प्रदेशात १९५१ मध्ये लावण्यात आलेल्या ४० हेक्टरच्या निलगिरी लागवडीचा दोन वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यात दिसून आले की निलगिरी असलेल्या भागात भूजल पातळी शेजारच्या गवताळ प्रदेशापेक्षा ०.५ मीटरहून अधिक खाली गेली आहे. निलगिरीची मुळे ५ ते ६ मीटर खोल जाऊन केवळ स्वतःच्या खालील पाणीच पीत नाहीत, तर आजूबाजूच्या प्रदेशातील पाणीही आपल्याकडे ओढून घेतात. यामुळे स्थानिक नद्या आणि विहिरी कोरड्या पडत आहेत.
उरुग्वेमध्ये सन २००० सालापासून सलग २० वर्षे दोन वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रांचा अभ्यास करण्यात आला. यातील एका भागात नैसर्गिक गवताळ प्रदेश होता, तर दुसऱ्या भागात निलगिरी आणि पाइनची लागवड करण्यात आली होती. लागवडीनंतर १७ वर्षांनी असे आढळून आले की, निलगिरीचे जंगल असलेल्या पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेत तब्बल ३५% घसरण झाली. निलगिरीच्या झाडांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वाहून जाते आणि जमिनीची धूप होते, असा निष्कर्ष निघाला.
पूर्वेकडील आफ्रिकन देश रवांडामध्ये तर या झाडाने भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. रवांडातील एकूण लागवड क्षेत्रापैकी ७८% क्षेत्र एकट्या निलगिरीने व्यापले आहे. हे झाड जमिनीतील नायट्रोजन, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक घटक इतक्या मोठ्या प्रमाणावर शोषून घेते की, मातीची सुपीकता पूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे अशा जमिनीत इतर कोणतेही पीक किंवा नैसर्गिक वनस्पती उगवणे अशक्य होऊन बसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर
भारतामध्येही रस्ते, शेतांच्या सीमा आणि सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत निलगिरीची कोट्यवधी झाडे लावली गेली आहेत. विशेषतः दुष्काळग्रस्त भागांत निलगिरीमुळे कूपनलिका (Borewell) आणि विहिरींचे पाणी आटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जर वेळीच या झाडांच्या लागवडीवर निर्बंध आणले नाहीत आणि नैसर्गिक स्वदेशी झाडांची (जसे की कडुनिंब, पिंपळ, वड) लागवड वाढवली नाही, तर भारतालाही मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.