
navarashtra navdurga
मात्र, या आव्हानाला मर्यादा न मानता तिने नृत्याच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली प्रेरणा आता कर्णबधिर मुलींसाठी विशेष नृत्यवर्ग सुरू करणार आहे. स्वतःच्या संघर्षातून इतरांच्या स्वप्नांना बळ देणारी ही नवदुर्गा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रेरणा सात वर्षांची असताना तिच्या पालकांची भेट पुण्यातील साधना नृत्यालयाच्या गुरू शुमिता महाजन यांच्याशी झाली. संगीत ऐकू न येणाऱ्या मुलीला भरतनाट्यम शिकविण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. वडील केशव सहाणे यांनी तब्बल १६ वर्षे तिला नियमितपणे नृत्यवर्गात नेले. गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर प्रेरणाने भरतनाट्यमच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या.
२ जून २००७ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात तिने अडीच तासांचे ‘अरंगेत्रम्’ सादर केले. सुमारे एक हजार प्रेक्षकांसमोर झालेल्या या एकल सादरीकरणातून तिने आपल्या कलेची ताकद सिद्ध केली. पुढे केदारनाथ मंदिराच्या प्रांगणासह देशातील विविध शहरांत तिने नृत्य सादर केले. संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित दोन तासांची एकल नृत्यनाटिकाही तिने सादर केली.
प्रेरणाला २०१५ मध्ये भारत सरकारचा ‘राष्ट्रीय पुरस्कार – रोल मॉडेल’ मिळाला. ‘रुक्मिणी पुरस्कार’ आणि ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’ यांसह तिला ३५ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जून २०२५ मध्ये हंगेरीतील आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात तिच्या समूहाने भारताचे प्रतिनिधित्व केले. २०२६ मध्ये श्रीलंकेतील नृत्य महोत्सवातही तिने सहभाग घेतला. तिच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रेरणा – द साउंड ऑफ सायलेन्स’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र शासनाचा २०१६ चा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार मिळाला.
आजवर ७५ हून अधिक कार्यक्रम सादर करणारी प्रेरणा विजयादशमीपासून कर्णबधिर मुलींसाठी भरतनाट्यमचे विशेष वर्ग सुरू करणार आहे. श्रवणक्षमतेच्या मर्यादेमुळे कोणत्याही मुलीला कलेपासून दूर राहावे लागू नये, हा तिच्या प्रयत्नांमागील उद्देश आहे. स्वतःच्या संघर्षाचे रूपांतर इतरांसाठी संधीत करणारी प्रेरणा ही केवळ यशस्वी नृत्यांगना नाही, तर अनेक मुलींच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी खरी ‘प्रेरणा’ आहे.