
स्थलांतरित प्रवासी पक्षी हे निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक
अनेक कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्वच आले धोक्यात
जलप्रदूषण वाढल्याने नष्ट होतेय जलसृष्टी
सुनयना सोनवणे/पुणे: हजारो मैलांचा प्रवास करून पुणे व आसपासच्या परिसरात येणारे स्थलांतरित प्रवासी पक्षी हे निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या मार्गांवर, मुक्कामाच्या ठिकाणी आणि खाद्यसाखळीत मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहेत. जलाशयांचे वाढते प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास यामुळे या पक्ष्यांचे (birds) अस्तित्वच धोक्यात आले आहे.
वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गयात्री या पर्यावरण संस्थेचे संचालक विशाल तोरडे स्थलांतरित पक्षांविषयी ‘नवरराष्ट्र’शी संवाद साधला. ते म्हणाले, “पुण्यातील कवडीपाट जलाशय, पाषाण तलाव यांसारखी ठिकाणे पूर्वी पक्ष्यांसाठी सुरक्षित आसऱ्याची ठिकाणे होती. कवडीपाट येथे दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पक्षी येत असत. मात्र, प्लॅस्टिक, घरगुती कचरा, राडारोडा व रासायनिक पाण्यामुळे जलप्रदूषण वाढले असून, परिणामी पाण्यातील जलसृष्टी नष्ट होत आहे. यामुळे पक्ष्यांचे अन्न कमी होऊन या भागात येण्याचे प्रमाण कमी होत आहे.”
पाषाण तलावाच्या बाबतीतही सुशोभीकरणाच्या नावाखाली नैसर्गिक दलदली बुजवण्यात आल्या, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखण्यात आला आणि जलपर्णीसारख्या उपद्रवी वनस्पती वाढल्या. याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला असून, येथील प्रवासी पक्ष्यांची संख्या सुमारे सातत्याने घटत आहे. तसेच माळरानांवरील अतिक्रमणांमुळे शिकारी पक्षी व माळरानांवर अवलंबून असलेल्या प्रजातींचा अधिवासही धोक्यात आला आहे. अपुऱ्या अधिवासामुळे सायबेरिया, मध्य आशिया, युरोप आणि लडाख वरून या परिसरातून येणारे अनेक पक्षी त्यांचे स्थान बदलत आहेत.
Navarashtra Special: पुणे सर्वांचे लाडके; हिवाळ्यात बनले स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान
अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांच्या मते, या परिस्थितीत स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. जलाशयांचे प्रदूषण रोखणे, नैसर्गिक दलदली व पाणवठे जतन करणे, मानवी हस्तक्षेप मर्यादित ठेवणे, कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, पर्यावरण तज्ञ आणि नागरिकांनी एकत्र येऊन संवर्धनासाठी प्रयत्न केल्यासच पुणे व परिसर पुन्हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित व समृद्ध ठिकाण ठरू शकतो.
हिवाळ्यात बनले स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान
महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर केवळ मानवी वस्तीपुरते मर्यादित नसून जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. नद्या, धरणे, तलाव, गवताळ मैदाने आणि जंगलांनी वेढलेल्या पुणे व परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्षी दाखल होतात.