हिवाळ्यात पुणे बनते स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान (फोटो- अमोल काळे)
पुणे शहर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध
हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्षी पुण्यात दाखल
अमोल काळे यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली सविस्तर माहिती
सुनयना सोनवणे/ पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर केवळ मानवी वस्तीपुरते मर्यादित नसून जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. नद्या, धरणे, तलाव, गवताळ मैदाने आणि जंगलांनी वेढलेल्या पुणे व परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्षी दाखल होतात.
सायबेरिया, मध्य आशिया, युरोप आणि हिमालयीन प्रदेशात हिवाळ्यात तीव्र थंडी व अन्नटंचाई निर्माण होत असल्याने अनेक पक्षी उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतात. समशीतोष्ण हवामान, मुबलक अन्नसाठा आणि विपुल पाणथळ क्षेत्रांमुळे पुणे परिसर या पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे.
देशांची चढाओढ अंतराळतही; अंतराळ स्थानके बांधण्यासाठी सर्वच शक्तीशाली देशांमध्ये लागली शर्यत
वन्यजीव छायाचित्रकार आणि पर्यटक मार्गदर्शक अमोल काळे यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना स्थलांतरित पक्षांबद्दलची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, पुण्याजवळील भिगवण (उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र) हे स्थलांतरित जलपक्ष्यांचे प्रमुख केंद्र मानले जाते. ‘मिनी भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात फ्लेमिंगो, विविध प्रकारची बदके, पानघार किंवा दलदल ससाणा, शबलपत्री ससाणा, मॉन्टेग्युचा भोवत्या, नेपाळी गरुड, पिंगट गरुड, शाही गरुड, मोठा ठिपकेदार गरुड, छोट्या कानाचे घुबड, निळकंठ, घोणस, कैकर यांसारखे सुमारे १२० हून अधिक स्थलांतरित पक्षीप्रकार आढळतात. हिवाळ्यात येथे १,००० पेक्षा जास्त फ्लेमिंगो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात.
याशिवाय कवडी बर्ड पॉईंट हा नदीकाठचा परिसर वॉडर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असून येथे शेकाट्या, हिरवी तुतारी आणि धोबी पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. पुण्यातील मुळा–मुठा नदी, पाषाण तलाव, खडकवासला धरण आणि वेताळ टेकडी परिसर येथेही गरुड, कैकर, विविध प्रकारची बदके, ढोकरी, बगळा आणि खंड्या यांसारखे स्थलांतरित पक्षी आढळतात. जंगल व अभयारण्य क्षेत्रांमध्येही स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ वाढते. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आणि मयुरेश्वर अभयारण्य येथे खंड्या, नीलिमा, शिकारी पक्षी आणि सुतार पक्षी हिवाळ्यात हमखास दिसतात.
हिवाळा स्थलांतरित पक्षी पाहण्याचा हा योग्य काळ आहे. सध्या भिगवण मध्ये फ्लेमिंगो सोबतच अनेक आलेले आहेत, ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी स्थलांतरित पक्ष्यांना भेट देण्यासाठी व पक्षीनिरीक्षणासाठी सर्वोत्तम आहे. विशेषतः सकाळी लवकर आणि संध्याकाळी पक्ष्यांची हालचाल अधिक असते.






