Uddhav Thackeray Birthday Photography hobby special article
Uddhav Thackeray Birthday : मागील कित्येक दशकापासून महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे कुटुंबाच्या अवती भोवती फिरते आहे. ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी ही आता राजकारणाच्या मैदानामध्ये उतरली आहे. एवढ्या वर्षांपासून कमावलेला जनतेमधील विश्वास आणि लोकप्रियता यामुळे आजही ठाकरे हा ब्रॅन्ड म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. ठाकरे कुटुंबातील राजकारणी हे त्यांच्या राजकारणासह त्यांच्या आवडी निवडी आणि छंदामुळे ओळखले जातात. ठाकरे कुटुंबाची भाषणे श्रोत्यांच्या मनामध्ये अक्षरशः घाव करतात. सध्याच्या सक्रीय राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची देखील राजकारणापलिकडील आवड आहे. राजकारण हा त्यांचा पिंड असला तरी फोटोग्राफी ही उद्धव ठाकरे यांचा छंद आहे.
ठाकरे कुटुंबाला राजकारणाची आणि समाजकारणाची परंपरा असली तरी त्या व्यतिरिक्त असणाऱ्या छंदाची किनार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रश हा समाज मनावर परिणाम कारक ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र ही तत्कालीन सरकारच्या कामावर चपराक मारणारी होती. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे रोमांच निर्माण करणारी होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा तिसरा डोळा अर्थात त्यांचा कॅमेरा हा विश्वाची नव्याने ओळख करुन देतो. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची मोठी आवड असून त्यांची अनेक चित्र ही थक्क करणारी आहेत.
उद्धव ठाकरे यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड होती (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
उद्धव ठाकरे यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे. फोटोग्राफीसाठी ते अनेक वर्षे राजकारणापासून विलप्त राहिले. उद्धव ठाकरे यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि नेचर ब्युटीचे फोटो काढण्याची खास आवड आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला देणगी लाभलेल्या गडकिल्ल्यांचे देखील उद्धव ठाकरे यांनी अनेक खास फोटो काढले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून एकदा गडकिल्ल्यांची सफर ही अद्भूत अनुभव देणारी ठरु शकते. त्यांच्या नजरेतून निसर्गाचे सौंदर्य आणखी खुलते. याची पर्वणी एका पुस्तकातून मिळू शकते. उद्धव ठाकरे यांनी काढलेली छयाचित्रे एकत्रित करून ‘महाराष्ट्र देशा’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील 27 मोठमोठ्या किल्यांचे एरियल व्ह्यूचे फोटो आहेत. यामध्ये शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, विशाल गड, पुरंदर आणि दौलताबाद हे किल्ले आहेत. सोबतच या पुस्तकात राज्याची प्रमुख मंदिरे आणि हाजी अली दर्ग्याच्या फोटोदेखील आहे. या सर्व फोटोमधून उद्धव ठाकरे यांच कॅमेऱ्याप्रती असणारी प्रीती सहज लक्षात येते.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेरामधून काढलेल्या फोटोची झलक (फोटो सौजन्य – Instagram)
गडकिल्ल्यांच्या एरियल फोटोसाठी आकाशातून किल्यांचे फोटो काढावे लागतात. यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा मंत्रालयाकडून क्लियरन्स घेतला होता. हे सर्व फोटो हेलिकॉप्टरमधून खूप उंचीवरून घेतले गेले आहेत. महाराष्ट्रातील किल्यांचे असे स्वरूप जगासमोर सादर करणाऱ्या उद्धव यांनी ‘दुर्ग प्रेमी संघटना’ देखील बनवली. याव्यतिरिक्त उद्धव यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारी देखील एरियल फोटोग्राफी केली आहे. 2008 साली उद्धव यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या ‘हडसन बे’ मध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअर आणि कम्बोडियाच्या मंदिराचे फोटो काढले. या फोटोंमुळे ते एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून समोर आले.
उद्धव ठाकरे यांनी काढलेले फोटो पाहताना राज ठाकरे आणि संजय राऊत (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांचे फोटोग्राफीवरील प्रेम जगविख्यात आहे. सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरे हे आपले फोटो शेअर करतात. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली आवड अधोरेखित केली होती. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते, फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. कुणी काहीही म्हणो, मी फोटोग्राफी सोडू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला छंद जोपासणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले होते. यानंतर ते जगातील सक्रिय ज्वालामुखी, अंटार्कटिक प्रदेश आणि माउंट एव्हरेस्ट पर्वतांच्या श्रृंखलेचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करू इच्छितात अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.