उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले (फोटो - एक्स)
Raj Thackeray At Matoshree : मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना मोठे वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले आहे. तब्बल 18 वर्षानंतर मनसे नेते राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मोठे समाधान आणि जल्लोष दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. मागील दोन दशकांपासून राज -उद्धव या भावंडामध्ये असणार वाद आता निवळला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आले होते. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे स्वतः त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल 18 वर्षानंतर मातोश्रीवर दाखल झाले आहेत. हा क्षण मनसे आणि शिवसेनेच्या समर्थकांसाठी अत्यंत भावनिक मानला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बांधण्यात आलेल्या स्टेजवर राज ठाकरे दाखल होताच एकच जल्लोष दिसून आला. राज ठाकरे आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आलिंगन देत त्यांचे आपुलकीने स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यामध्ये स्मितहास्य उमटले होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची पाठ थोपटवत त्यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल गुलांबाचा गुच्छ दिला. यानंतर दोन्ही नेते मातोश्रीच्या आतमध्ये गेले. राज-उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर एकत्रित आशिर्वाद घेत फोटो देखील काढला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर राज-उद्धव ठाकरे यांचे एकत्रित येणे ही नवीन राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. याविरोधात आवाज उठवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले होते. तब्बल दोन दशकांनंतर राज-उद्धव हे एका मंचावर आले. यावेळी पार पडलेल्या विजयी सभेमध्ये राज-उद्धव हे एकत्रित मंचावर बसलेले दिसून आले. दोन्ही भावांनी भाषण केल्यानंतर मराठी माणसांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मात्र हे एकत्रित येणे हे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असल्याचे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र दोन्ही पक्षांची भविष्यामध्ये युती होणार की नाही याबाबत राज ठाकरे यांनी मोठी गोपनियता पाळली आहे. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर दिलेली ही भेट सूचक मानली जात असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.