सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे टिळक, पण पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे कोण?
गणेशोत्सव साजरा केल्यानंतर अनेकांना वेध लागले ते नवरात्रीचे. ज्याप्रमाणे गणेशोत्सवात एक चैतन्यमय वातावरण निर्माण होते तसेच वातावरण आपल्याला नवरात्रीत सुद्धा पाहायला मिळते. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात आपण सर्वांनीच वाचले आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. पण तुम्हाला सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात कोणी केली याबद्दल माहीत आहे का चला आज आपण त्या थोर व्यक्तीबद्दल जाणून घेऊया.
सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत, हे आपण सर्वेच जाणतो. या शिवसेनेची स्थापना 50 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. याच बाळासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनीच महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला. आणि त्यांच्या मदतीला होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आपण सर्वेच जाणतो की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली होती. यामागचे उद्दिष्ट सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करणे होते. पुढे गणेशोत्सव एक मोठा सण साजरा होऊ लागला, ज्यात उच्चवर्णीय समुदायाचे वर्चस्व जास्त होते. यातील काही कर्मठ लोकं दलितांना गणरायाचे दर्शन घेण्यास येऊ देत नव्हते. यामुळे प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक राव बहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणेतर लोकांना सुद्धा गणरायाला पुजण्यास द्यावे अशी मागणी केली. हा गणेशोत्सव दादरमध्ये साजरा केलं जात होता.
नेहमीप्रमाणे या कर्मठ लोकांनी त्यांची मागणी अमान्य केली. यानंतर प्रबोधनकारांनी एक कडक पवित्र घेतला ज्यानंतर एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार डॉ. आंबेडकरांचे निकटवर्तीय गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांनी आपल्याकडील फुलं ब्राह्मण पुरोहितास देईल. यानंतर ही फुलं गणरायाला अर्पण केले जाईल.
या घटना पुढे वाढू नये म्हणून कर्मठ व धर्मांध लोकांनी दादरमधील सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. आता लोकांना एकत्रित करण्यासाठी एका मोठ्या सणाचा आधार घेणे महत्वाचे होते. अशावेळी प्रबोधनकारांनी महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांची कुलदेवता तुळजापूरच्या देवीला अग्रस्थानी ठेऊन नवरात्रोत्सव हा सण निवडला.
जातीभेदाच्या कचाट्यात सापडलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी 1926 साली मुंबईतल्या दादरमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी दादरमधील प्लाझा सिनेमासमोर एक मोकळे मैदान होते ज्याला लोकं काळं मैदान म्हणून ओळखायचे. याचा मैदानात महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज हेच मैदान वीर कोतवाल उद्यान म्हणून ओळखले जाते. पुढे कालांतराने हा उत्सव दादरमधील खांडके चाळीत साजरा होऊ लागला व आजही तो सुरु आहे.
या नवरात्रोत्सवाची खास बाब म्हणजे सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना संबोधित केले होते. आज जर तुम्ही या दादरमधील खांडके चाळीतील नवरात्रोत्सवाला भेट दिली तर तुम्हाला देवीची सुंदर व शाडू मातीने बनलेली मूर्ती पाहायला मिळेल.