trishunda ganapati mandir pune talghar open on gurupourima information in marathi
Trishunda Ganapati talghar on gurupourima : प्रिती माने : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये अनेक वैभवशाली मंदिरांचा इतिहास दडला आहे. या भागामध्ये भगवान शिव आणि गणरायाची मंदिरे आहेत. यातील असेच एक 17 व्या शतकातील नयनरम्य मंदिर म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर. स्थापत्य कलेचा आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्रिशुंड गणपती मंदिर ओळखले जाते. या मंदिराला तळघर असून हे तळघर केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते.
सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिर हे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. मंदिराच्या कोरीवासह मंदिराखाली असलेल्या तळघराविषयी देखील सर्वांना उत्सुकता आहे. मंदिर जेवढे वरती सुंदर आहे तितकेत शांत या मंदिराचे तळघर आहे. त्रिशुंड गणेशमूर्तीच्या अगदी खाली दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. संपूर्णवेळ पाण्यामध्ये असणाऱ्या या तळघराचे दरवाजे वर्षातून एकदा केवळ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उघडण्यात येतात. हजारो भाविकांनी आजच्या दिवशी दर्शनासाठी त्रिशुंड गणपती मंदिराबाहेर गर्दी केली होती.
मंदिराच्या तळघराला जाण्यासाठी सभामंडपातून दरवाजे आहेत. एक ते दीड फुटी पायऱ्यांनी खाली उतरुन तळघरामध्ये जाता येते. तळघर हे गुडघापर्यंत पाण्याने भरलेले असते. तळघराच्या दगडांमधून जीवंत झरा वाहत असतो. या पाण्यातून तळघर हे नेहमी पाण्यामध्ये असते. तळघराच्या छतावर देखील दगडी झुंबर कोरण्यात आलेले आहे. त्याचबरोबर योग साधना करण्यासाठी तळघरामध्ये वेगळी खोली असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तळघरातून पायऱ्या वर चढून गेल्यानंतर दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. या समाधीवर देखील छोटा दगडी गणराय असल्याचे दिसून येते. मंदिराचे तळघर हे पाण्याने भरलेले थंडगार असून मनाला शांत करते. गजबजलेल्या शहरामधील तळघरातील ही शांतता मनाला भावते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वी हटयोग साधना केंद्र असल्याचे सांगितले जाते. मंदिरावर कोरण्यात आलेल्या शिल्पांमध्ये देखील विविध योग साधना दाखवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणपती असून तीन सोंड असलेला हा एकमेव गणराय मानला जातो. गणपती हा मोरावर विराजमान असून त्याच्या एका मांडीवर शक्तीस्वरुप देवी विराजमान आहे. गणरायाची एक सोंड देवीच्या हनुवटीवर टेकली आहे. तर दुसरी सोंड ही दुसऱ्या हातामध्ये असलेल्या लाडूवर आहे. अत्यंत सूबक आणि काळ्या पाषाणातील गणरायाची मुर्ती मन प्रसन्न करते.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून वेरूळच्या कोरीव लेणीदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. 17 व्या शतकामध्ये बांधून पूर्ण झालेल्या या मंदिराचे कोरीवकाम थक्क करणारे आहे. मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराची निर्मिती केली.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
त्रिशुंड गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर रेखीव द्वारपाल कोरले असून हातांमध्ये दंडक आहेत. त्याचप्रमाणे रेखीव कोरीवकामाने देवळ्या, द्वारशिखा आणि प्रवेशद्वार सजवण्यात आल्या आहे. काळ्या पाषाणात कोरीवकाम करण्यात आले असून यामध्ये गजलक्ष्मी, माकडांची रांग, महिला, गणपती, एकशेंगी गेंडा, इंग्रज सैन्य, हटयोगी साधना, बासरी वाजणारा कृष्ण, पोपट, घंटनाद, गणराय, तसेच विठ्ठल रुक्मिमी असे नानाविध शिल्प कोरण्यात आले आहे. गुजराती पद्धतीच्या झरोके कोरण्यात आले आहे. ललाटबिंबावर गणपती आणि गजलक्ष्मी तसेच शिव पार्वती आहेत. त्याचबरोबर अनेक मानवी चेहरे असून प्रत्येक मूर्तीवरील भाव वेगळे आहेत. तसेच चंद्र, सूर्य कोरण्यात आले आहेत.