कोण आहेत राहुल देशमुख?
पुणे/वैष्णवी सुळके: समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत, त्यातीलच एक घटक म्हणजे समाजाचाच एक अविभाज्य भाग असणाऱ्या दृष्टिहीन व्यक्ती आहेत. ज्यांसाठी एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना भिक्षुकीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, याच दुर्लक्षित घटकाला आपल्या शिक्षणाने आणि जिद्दीने, कर्तृत्वाच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करत राहुल देशमुख यांनी जगण्याची एक नवीन दृष्टी मिळवून दिली आहे.
गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनासाठी गुरूंच्या ऋणाची आठवण काढण्याचा, त्यांच्या योगदानाला नमन करण्याचा दिवस. या दिवशी पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेचा गौरव केला जातो. याच पवित्र दिवशी आपण एका अनोख्या गुरूचा गौरव करत आहोत, जो स्वतः दृष्टिहीन असूनही हजारो अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणारे, आयुष्य बदलवणारे गुरु आहेत. राहुल देशमुख हे केवळ नाव नाही, तर निर्धार, दृष्टीहीनतेवर मात करणारी जिद्द, आणि समाजासाठी अपार तळमळ असलेला एक तेजस्वी दीपस्तंभ आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहून शिक्षण घेतलेल्या या तरुणाने स्वतःच्या अंधत्वावर मात करत केवळ स्वतः यश मिळवलं नाही, तर ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’ या संस्थेच्या माध्यमातून २५०० हून अधिक नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, डिजिटल लायब्ररी, विशेष वसतिगृह, शिष्यवृत्ती प्रकल्प, आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून नवी दिशा दिली आहे.
आपल्याकडे जीवन जगण्याचे आयुध असलेल्या बुद्धीमत्ता यावर आपण लढू शकतो हे ओळखून या एकमेव माध्यमातून समाज बदलण्याची सुरुवात त्यांनी स्वत: पासून केली. ते म्हणतात, आपला दृष्टिकोन इतका पवित्र असायला हवा की परमेश्वराने दिलेलं काम म्हणून आपल्याला ही जबाबदारी मिळाली आहे. गरजू आणि प्रयत्नशील मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. ही खेड्यांतून आलेली स्वप्न बघणारी मुले आज विविध क्षेत्रात देशाच्या विकासात मोलाचं योगदान देत आहेत. त्यांचं यश हे फक्त यश नाही, ती एक साधना असते. हे काम करताना मिळणारं समाधान शब्दांत व्यक्त करता येत नाही.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा अद्वितीय गुरूला ज्याने जगाला एका वेगळ्या दृष्टीने पाहिले ज्यांच्या अंतःकरणात अपार तेज आहे आणि यांसारख्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला कृतज्ञतेने वंदन करणं हीच खरी गुरुपौर्णिमेची सार्थकता आहे.
चौकट
मनुष्यजन्म हा फार मोठ्या कालानंतर मिळतो, म्हणून तो वाया जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. आपले आयुष्य आपलेच आहे, त्यामुळे प्रत्येकाने आणि विशेषतः तरुणांनी सत्कर्म करण्याचा विचार करायला हवा. तरुणांकडे वेळ आणि क्षमता भरपूर असते, फक्त त्या योग्य पद्धतीने वापरण्याची गरज आहे. वेळेचं योग्य नियोजन करून आपली ऊर्जा चांगल्या आणि समाजासाठी उपयुक्त अशा कामांसाठी वापरायला हवी. वाचन करून, चांगल्या गोष्टी करून आपण जीवनात खरं सौंदर्य अनुभवू शकतो.
माझ्या कामाच्या क्षेत्रात ज्यांची मदत झाले असे गुरु मला भेटले. मी त्यांच्याकडून प्रशासन शिकलो, माझ्या कामाच्या क्षेत्रात त्यांनी मला खूप मार्गदर्शन आणि मदत केली. त्यांच्याकडून काम कसे करायचे हे मी शिकलो त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वेळेला अनेक गोष्टी कशा पद्धतीने करायचा त्यांचा ताळमेळ कसा साधला पाहिजे हे मी माझे गुरु श्रीनिवास पाटील यांच्याकडून शिकलो. त्यांच्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे गुरु हे मार्गदर्शनासोबत कामात मदत करणारे गुरु आहेत. ज्यांचा माझ्या कामात सक्रिय सहभाग असतो. तसेच अध्यात्मिक बाबतीत पाहिल्यास प्रतिभाताई आणि शाहू मोडक यांनी मला खूप मार्गदर्शन केलेले आहे.
– राहुल देशमुख,
संस्थापक अध्यक्ष,
नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजीकली चॅलेंज्ड