टी २० विश्वचषकानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. काल १७ नोव्हेंबर पासून या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ८६ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला. मात्र लाईव्ह सामन्यात असे काही घडले की स्टेडियमवर एकच हशा पिकला.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा छोटा फॅन यांच्यात लाईव्ह सामन्यादरम्यान चिठ्ठ्यांची देवाणघेवाणही रंगली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना एका छोट्या चाहत्याने प्रेक्षक गॅलरीतून एक चिठ्ठी सर्वांना दाखवली. या चिठ्ठीद्वारे या छोट्या चाहत्याने डेव्हिड वॉर्नर तू मला तुझा शर्ट देऊ शकतो का? असे विचारले. यानंतर कॅमेरामनने कॅमेरा डगआऊटमध्ये बसलेल्या डेव्हिड वॉर्नरकडे वळवला. डेव्हिड वॉर्नर मुलाची चिठ्ठी पाहून हसतो. त्यावेळी शेजारी बसलेले खेळाडू त्याची चेष्टा करू लागतात आणि त्याचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करतात.
This was a great banter from Warner.pic.twitter.com/ywqxvjmDPG — Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2022
डेव्हिड वॉर्नर आपल्या शेजारी खेळाडूंना सांगतो की मी आतमध्ये काही घातलेलं नाही. यानंतर वॉर्नर देखील कॅमेरामनला एक चिठ्ठी दाखवतो. या चिठ्ठीवर ‘मार्नस लॅम्बुशग्नेचा शर्ट घे’ असे लिहिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून तो छोटा मुलगा दुसरी चिठ्ठी दाखवतो त्यात, ‘मार्नस कृपया मला तुझा शर्ट मिळू शकतो का?’ असे लिहिलेले होते. यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेले डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस हे जोरजोरात हसू लागतात.