
एकेरीत सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय
स्पर्धेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या एकेरीच्या अंतिम फेरीत पुण्याच्या अधिराज दुधानेचा सामना कबीर गुंडेचा याच्याशी झाला. सुरुवातीपासूनच उत्कृष्ट सर्व्हिस आणि आक्रमक फोरहँडच्या जोरावर अधिराजने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. त्याने कबीरचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. याआधी खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अधिराजने लव परदेशी याच्याविरुद्ध वर्चस्व गाजवत ६-०, ७-५ अशी मात केली होती आणि अंतिम फेरीत धडक मारली होती.
दुहेरीतही वर्चस्व कायम
एकेरीपाठोपाठ दुहेरीच्या अंतिम लढतीतही अधिराजने आपली विजयाची लय कायम ठेवली. अधिराज दुधाने आणि त्याचा साथीदार अर्जुन दुवा या जोडीने अप्रतिम ताळमेळ दाखवत आवीर घुमरे व निहाल रेड्डी या प्रतिस्पर्धी जोडीचा ६-१, ६-३ असा सहज पराभव केला आणि दुहेरीचे विजेतेपद खिशात घातले. त्याआधी उपांत्य फेरीत अधिराज आणि अर्जुन या जोडीने आदेश पीएम व जोहेल जॉन्सन या जोडीला ६-०, ६-२ अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
शाळा अन् प्रशिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
अधिराज दुधाने हा पुण्यातील कोथरूड येथील ‘न्यू इंडिया स्कूल’मध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तो ‘रोहित शिंदे टेनिस अकादमी’ येथे मुख्य प्रशिक्षक रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे कठीण धडे आणि नियमित सराव करत आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या दुहेरी यशामुळे अधिराजचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.