Los Angeles Olympics: After 128 years, the thrill of cricket will be played at the Los Angeles Olympics! 'These' six teams will compete..
दिल्ली : क्रिकेटप्रेमीसाठी एक आनंदांची बातमी समोर आली आहे. तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी सहा संघ सुवर्णपदकासाठी लढताना दिसून येणार आहेत. आयोजकांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. १९०० च्या पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेटचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यावेळी केवळ फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हेच संघ क्रिकेटमध्ये भाग घेताना दिसून येत होते. या दोन्ही संघांमध्ये दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला होता. ज्याला अनधिकृत कसोटी सामन्याचा दर्जा आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिकमधील क्रिकेट टी-२० स्वरूपात खेळले जाणार आहे. ज्यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहा संघ सहभागी होणार आहे.
प्रत्येक संघ १५ सदस्यांचा संघ निवडू शकणार आहेत. कारण पुरुष आणि महिला दोघांसाठी प्रत्येकी ९० खेळाडूंचा कोटा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदमध्ये १२ पूर्ण सदस्य आहेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे. याशिवाय, ९४ देश सहयोगी सदस्य आहेत. २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु यजमान देश म्हणून अमेरिकेला थेट प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक श्रेणीतील उर्वरित पाच संघ पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित करणार आहेत.
हेही वाचा : DC Vs RCB: केएल राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीचा दबंग विजय; आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव
एका विशिष्ट मुदतीपर्यंत आयसीसी क्रमवारीत अव्वल पाच संघांना अमेरिकेसह ऑलिंपिक खेळांमध्ये प्रवेश मिळेल असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने पुढील ऑलिंपिक खेळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिलेल्या पाच खेळांपैकी क्रिकेट हा एक खेळ आहे. इतर चार खेळ म्हणजे बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश.
आयओसी कार्यकारी मंडळाने २०२८ च्या ऑलिंपिक खेळांसाठी स्पर्धा वेळापत्रक आणि खेळाडूंच्या कोट्याला मान्यता दिली. या खेळांमध्ये २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकपेक्षा २२ पदक स्पर्धा जास्त असतील. २०२८ च्या ऑलिंपिकसाठी आयओसीने विक्रमी ३५१ पदक स्पर्धांना मान्यता दिली आहे. परंतु खेळाडूंची संख्या १०,५०० राहील. खेळाडूंच्या संख्येत नवीन खेळांचे ६९८ खेळाडू देखील समाविष्ट आहेत. ऑलिंपिक खेळांच्या इतिहासात प्रथमच, सांघिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या समान असेल.