जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला (BWF World Championships 2022) २३ ऑगस्ट पासून जपानमधील टोकियो येथे सुरुवात होणार आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (P V Sindhu) ही दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेत खेळू शकणार नाही. पी व्ही सिंधूला झालेली दुखापत हा भारतासाठी एक मोठा धक्का असून सिंधूच्या अनुपस्थितीत भारत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आता भारताला पदकासाठी लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत या पुरुष एकेरीतील खेळाडूंसह सात्विक रेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील खेळाडूंन आशा आहेत.
सिंधूने जागतिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पाच पदके जिंकण्याची करामत करून दाखवली आहे. सिंधूच्या अनुपस्थितीत २०११ पासून सुरू झालेली पदकांची मालिका कायम राखण्याचे आव्हान भारतीय खेळाडूंवर असणार आहे. २०२१ मधील स्पर्धेमध्ये श्रीकांतने रौप्य आणि लक्ष्यने ब्राँझ पटकावले होते. त्यावेळी काही प्रमुख खेळाडूंचा सहभाग स्पर्धेदरम्यान नव्हता. जपानचा केंटो मोमोटा तसेच जॉनाथन ख्रिस्ती, अँथोनी गिंटिंग हे इंडोनेशियाचे खेळाडू यंदा सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुरुष गटात भारतीय खेळाडूंना आव्हानाचा सामना करावा लागेल. तर लक्ष्य सेन व एच. एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू तिसऱ्या फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे, पण त्याआधी दुसऱ्या फेरीत प्रणॉय याच्यासमोर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या केंटो मोमोटा याचे आव्हान असणार आहे.