Asia Cup 2025: 'BCCI is against the government's decision...', before the India-Pakistan match, the batting coach made a big claim
IND VS PAK : आशिया कपमध्ये आतापर्यंत चार सामने खेळून झाले आहेत. आज श्रीलंका आणि बांगलादेश आमनेसामने असणार आहे तर १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या स्पर्धेत भारताने यूएईला तर पाकिस्तानने ओमानला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे. आता हे दोन संघ १४ सप्टेंबर रोजी समोरासमोर येणार आहेत. या सामन्यापूर्वी, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमचे लक्ष सामन्यावर आहे.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक असणारे सितांशू कोटक यांनी सांगितले की, जेव्हापासून बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हापासून संघाकडून आता लक्ष पूर्णपणे क्रिकेटवर केंद्रित करण्यात आले आहे. मे महिन्यात सीमेवर वाढलेल्या तणावानंतर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील हा पहिलाच सामना असणार आहे.
हेही वाचा : Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या
आयसीसी अकादमी मैदानावर भारताच्या सराव सत्र सुरू होते त्यानंतर कोटक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी सांगितले की, जेव्हापासून बीसीसीआयकडून सरकारच्या निर्णयाशी सहमती दर्शवत असल्याचे सांगण्यात आले, तेव्हापासून आमचे लक्ष नेहमीच सामन्यावर राहिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा एक मनोरंजक सामना असणार आहे. कोटक पुढे म्हणाले की, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात नेहमीच स्पर्धात्मक सामना होत आला आहे.
काश्मीरमधील पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावामुळे क्रिकेटपटू प्रभावित होण्याची शक्यता आहे का?असा प्रश्न विचारल्यावर कोटक म्हणाले की, “खेळाडू मैदानावर लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या मनात दुसरे काहीही एक नाही.”
एप्रिलमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला. यामुळे आता पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याविरुद्ध भारतामध्ये सोशल मीडियावर बराच निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, मागील महिन्यातच, भारत सरकारने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत क्रीडा संबंधांबाबतीत एक धोरण आखण्यात आले. ज्या अंतर्गत भारत कोणत्याही खेळात पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामने खेळणार नाही, जरी ते तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आले तरी देखील नाही. परंतु त्यांना बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे लागणार आहे.