फोटो सौजन्य AI
भारतीय युवा खेळाडू आयुष शेट्टी याच्यासाठी मात्र स्पर्धेची सुरुवातच मोठ्या आव्हानाने होणार आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत त्याची लढत चीनचा गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू शी यू ची याच्याशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे बॅडमिंटनप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.
Commonwealth TT : कॉमनवेल्थ टेबल टेनिसमध्ये पुण्याचा डंका; दोन युवा खेळाडूंची भारताच्या संघात निवड!
आयुषने यापूर्वी 2026 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आपली क्षमता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला शी यू चीविरुद्धच पराभव स्वीकारावा लागला होता. आता जागतिक अजिंक्यपदाच्या पहिल्याच फेरीत पुन्हा एकदा दोघे आमनेसामने येणार आहेत.
भारतीय चाहत्यांच्या नजरा केवळ आयुषच्या सामन्यावर नसून पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्यावरही असतील. सिंधूकडून पुन्हा एकदा मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. लक्ष्य सेनदेखील स्पर्धेसाठी विशेष तयारी करत असून भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
पुरुष दुहेरीत सात्त्विक आणि चिराग ही भारताची सर्वात मोठी पदकाची आशा मानली जात आहे. जागतिक दर्जाच्या या स्पर्धेत भारताला अनेक विभागांत पदक मिळवण्याची संधी आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या इंडिया ओपनदरम्यान स्टेडियममधील परिस्थितीबाबत काही तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर आयोजकांनी वातानुकूलन, प्रकाशयोजना आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा केल्याचे सांगितले आहे.
17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 23 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भारतीय बॅडमिंटनसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. घरच्या कोर्टवर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर किती मोठी कामगिरी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






